
रत्नागिरी “मनसे”कडून त्रिभाषा धोरण समितीच्या दौऱ्यात हिंदी भाषा सक्तीला विरोध
रत्नागिरी : आज (३१ ऑक्टोबर) रत्नागिरीत त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या संवाद दौऱ्यात रत्नागिरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) अविनाश सौंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित राहून सरकारच्या त्रिभाषा धोरणा आडून हिंदी सक्तीला विरोध दर्शवीला.
या बैठकीला शिक्षण विभागाचे अधिकारी व सरकारी शिक्षक व्यतिरिक्त इतरांना निमंत्रित का केले नाही, याबाबत देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला. संपूर्ण जग व्यवसायभिमुख शिक्षणासाठी आग्रही असताना आपले सरकार अजून ही भाषा सक्तीच्या पुढे विचार करत नाही आहे. भाषा सक्ती करण्याऐवजी इयत्ता आठवीपासून कृषी व मत्स्यविषयी शिक्षणाची तोंडओळख देणारे शिक्षण सुरू करा. ज्यामुळे दहावी आणि बारावीनंतर काय अशा प्रकारचे मेळावे घ्यावे लागणार नाहीत. विद्यार्थ्यांना त्यांना कोणते क्षेत्र निवडायचे, असा प्रश्न पडणार नाही, असे सूचित करण्यात आले.
तसेच बैठकीत अनेक शिक्षक मराठी बोलताना देखील अडखळत होते. त्यावर देखील शिक्षण अधिकारी यांनी लक्ष घालावे, अशी सूचना देखील करण्यात आली.
यावेळी कामगार सेना जिल्हाचिटणीस महेंद्र गुळेकर, अरविंद मालाडकर, सचिन शिंदे, गौरव चव्हाण, संपदा राणा, शैलेश मुकदम व अशोक गोसावी उपस्थित होते.




