
रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे कोकणरत्न साहित्यिक पुरस्काराने सन्मानित होणार
रत्नागिरी : रत्नागिरीत गेली पन्नास वर्षे रंगभूमीची अविरतपणे सेवा करणारे रंगकर्मी कलाकार सुहास भोळे यांना स्वतंत्र कोकण राज्य अभिययानातर्फे कोकणरत्न साहित्यिक पुरस्कार नुकताच अध्यक्ष धनंजय कुसवेकर यांनी जाहीर केला आहे. स्वतंत्र कोकण अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे पहिले कार्य म्हणून मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत संपूर्ण कोकणातील सुमारे दीडशे निवडक व्यक्तिंना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचा उल्लेख स्वतंत्र कोकणराज्य अभियानातर्फे कोकण रत्न पदवी असा करण्यात आला असून त्याबाबतच्या निवडीचे पत्र पाठविण्यात आले आहे.
हा पुरस्कार प्रदान सोहळा १३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान शेजारी, मुंबई येथे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पत्रकार, संपादक सचिन कळझुनकर उपस्थितीत राहणार असल्याचे अध्यक्ष श्री. कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे व सल्लागार दिलीप लाड यांनी कळविले आहे.
सुहास भोळे हे संपूर्ण महाराष्ट्रात कलावंत म्हणून सुप्रसिद्ध आहेत. त्यांना आतापर्यंत हबीब तन्वीर राष्ट्रीय पुरस्कार (२०१७), मधुकर तोरडमल चतुरस्त्र रंगकर्मी पुरस्कार (२०२२), भागोजीशेठ कीर काव्य पुरस्कार (२०२५), साहित्य कला साधना पुरस्कार (१९९४),
गुणवंत कामगार पुरस्कार (१९९२), दुसऱ्या कामगार साहित्य संमेलनात ‘टकराव’ ला नाट्यलेखन ‘साहित्य पुरस्कार’ (१९९१) तसेच कामगार कल्याण स्पर्धेत सलग ३ वर्षे ‘सर्वात्कृष्ट’ नाट्यलेखन पुरस्कार (१९८५,८६,८७) मिळालेले आहेत. त्यांनी रंगभूमीवरील सर्वच क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले असून लेखन, दिग्दर्शन, अभिनय, प्रकाश, नेपथ्य असे सर्वच नाट्यांगातील २६८ पुरस्कार लाभले असून ते अध्यक्ष असलेल्या जिज्ञासा थिएटर्स या संस्थेला राज्यस्तरीय ११६८ पुरस्कार प्राप्त केले आहेत.
श्री. भोळे यांनी ३५ मराठी, हिंदी व इंग्रजी नाटकांचे लेखन केले असून ५० कलाकृतींची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. यासोबत त्यांनी तीन मराठी, दोन हिंदी व दोन इंग्रजी भाषेतील कादंबरी लेखन पूर्ण केले आहे. त्यांची आठवी नवीन कादंबरी लवकरच लिहून पूर्ण होईल. त्यांनी अनेक कथा, कविता, ललित लेख लिहिले आहेत. त्यांनी सुप्रसिद्ध रंगकर्मी प्रमोद पवार निर्मित व्यावसायिक नाटक ‘चला जगुया आनंदाने’ ची प्रकाशयोजना सुद्धा केली आहे.
आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून त्यांचे अनेक कार्यक्रम प्रक्षेपित झाले असून सांगली आकाशवाणीतर्फे सुद्धा त्यांची मुलाखत प्रक्षेपित झाली आहे. दूरदर्शनवर त्यांची “पूर्णविराम” ही गाजलेली एकांकिका सादर झाली होती, तर अनेक मालिकांतून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. “स्वामी समर्थ”, “अग्निदिव्य”, “प्राईम टाईम”, “सिनेमास्कोप” या मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका ‘शेर शिवराज’ व ‘सुभेदार’ व आगामी एका या ऐतिहासिक चित्रपटात भूमिका केल्या आहेत. शिवराज अष्टकचे निर्माते सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर श्री. भोळे यांना गुरुस्थानी मानतात.
सुहासजींनी १९७८ साली नौदलाचे अखिल भारतीय समुद्री प्रशिक्षण पूर्ण केले असून
यावेळी आय.एन्.एस्. त्राता, आय.एन्.एस्. कुठार, नौकावाहू आय्.एन्.एस्. विक्रांत या युद्धनौकांवर प्रत्येकी आठ दिवस तसेच आय्.एन्.एस्. खांदेरी या नौदलाच्या पाणबुडीत एक रात्र राहण्याचा अविस्मरणीय अनुभव घेतला आहे.
आयोजक म्हणून श्री. भोळे यांनी जिज्ञासा थिएटर्सच्या माध्यमातून १९८८-८९ ते १९९८-९९ पर्यंत आंतरराज्य एकांकिका स्पर्धेचे यशस्वी आयोजन, २००० साली समांतर रंगभूमी राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव, २००३ ते २००५ राष्ट्रीय दिव्यांग मुलांचा महोत्सव, १९८५ ते २०२५ विविध स्पर्धांचे सातत्याने आयोजन, १९९१ पासून सातत्याने बालनाट्य व नाट्यशिबिरांचे यशस्वी आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच नाट्य व एकांकिका स्पर्धांना ते परीक्षक या नात्याने सुमारे ४० शहरांत जाऊन आले आहेत. ते स्वतः एक उत्तम गायक असून त्यांच्या स्वतःच्या यु-ट्यूब चॅनेल वर त्यांची गाणी, त्यांनी बनविलेले लघुपट व अनेक गोष्टी पहायला मिळतात. आपल्या या यशाचे सर्व श्रेय ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या पत्नी सौ. आकांक्षा तसेच कन्यका जिज्ञास व अक्षताला देतात. आजपर्यंत जे जे कलावंत माझ्यासोबत वावरले त्या सर्व कलावंतांमुळे आपण इथपर्यंत पोहोचू शकलो याची जाणीव त्यांना आहे. सुहास भोळेंना लाभलेल्या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व थरातून कौतुक करण्यात येत आहे.




