
रत्नागिरीच्या किनाऱ्यांवर ‘लायन्स मेन’ जेलीफिशचा धोका
पर्यटकांना समुद्रात न उतरण्याचे आवाहन
रत्नागिरी : रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या संख्येने जेली फिश आढळून आले आहेत. वादळी परिस्थिती, खोल समुद्रात सुटलेले वारे, समुद्रातील अंतर्गत प्रवाहातील बदलामुळे या जेली फिश किनारी भागाकडे फेकल्या गेल्या आहेत.
या जेली फिश जांभळ्या रंगाच्या सिंहाच्या आयाळाप्रमाणे असल्याने त्यांना लायन्स मेन असे देखील म्हटले जाते. दरम्यान किनाऱ्याच्या वाळूत रूतल्याने हजारो जेलीफिशचा मृत्यू झाला आहे. जली फिश प्रचंड विषारी असतात, त्यांचा अंगाला स्पर्श होताच तीव्र वेदना होते. त्यामुळे या माशांपासून दूर राहण्याचे आवाहान करण्यात आले आहे. साधारणपणे समृद्रात २० ते २५ वाव खोल हे जेली फिश आढळून येतात, ते कधीकधी समुद्राच्या पुष्ठ भागावर देखील तरंगतात.
जेली फिश मोठ्या संख्येने समुद्राच्या किनाऱ्यावर आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आरे वारे, गणपतीपुळे, माडबन, सागरीनाटे, आंबोळगड, गावखडी, भाट्ये, मालगुंड या किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात जेली फिश आढळून आले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.




