
पावस येथे शेख महंमद पीर उरूसास ४ नोव्हेंबरपासून प्रारंभ
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र पावस गावात शेख महंमद पीर यांच्या उरुसाला शुक्रवारपासून (४ नोव्हेंबर) प्रारंभ होणार आहे. हजरत महंमद पीर २२५ वर्षांपूर्वी पैगंबरवासी झाले, तेव्हापासून त्यांचा उरूस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा होत आहे.
पावस येथे सालाबादप्रमाणे शेख महंमद पीर दर्गा येथे ४ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजता मिरवणुकीने येऊन समाधीवर चंदन चढवून सुरूवात होणार आहेत. ५ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता शेख महंमद बाबांच्या समाधीवर सामुदायिक पद्धतीने महावस्त्र (गिलाफ) परिधान करण्यात येणार आहेत. ६ नोव्हेंबर रोजी हजरत महंमद पीर दर्गा पावस आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी १० ते संध्याकाळी ५ यावेळेत मोफत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. उरूसाची सांगता सायंकाळी ७.३० वाजता महाप्रसादाच्या वाटपाने होईल.
हजरत महंमद पीर जागृत देवस्थान असून नवसाला पावत असल्यानेच सर्वधर्मीय लोक पावस येथे दरवर्षी मोठ्या संख्येने नवस फेडायला येतात. या तीन दिवसांत स्थानिक विविध प्रकारचे स्टॉल्स लावतात. त्यातून चांगले उत्पन्न मिळते. शेख महंमद पीर दर्गाचे विश्वस्त मंडळ हे व्यवस्थापन पाहत असून मंडळाचे अध्यक्ष फैअली हुसेनखान फडनाईक आणि दाऊद महामूद मुजावर आणि ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व भाविकांनी या उरूसास उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.




