
दाभोळकरांचे विचारधन आता इंग्रजीत; राही डहाके यांनी केला दहा पुस्तिकांचा अनुवाद!
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन आणि विवेकनिष्ठ समाजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवून त्यासाठी प्राणाचे बलिदान देणारे डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांचे विचारधन आता इंग्रजीमध्ये उपलब्ध झाले आहे. विविध विषयांवरील दाभोलकर यांच्या दहा पुस्तिकांचा इंग्रजीच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. राही डहाके यांनी अनुवाद केला असून, दाभोळकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शनिवारपासून (१ नोव्हेंबर) पूर्वनोंदणी केलेल्या वाचकांना या पुस्तिकांचे वितरण होणार आहे.
‘खूप दिवसांपासून डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या छोट्या मराठीतील पुस्तिका इंग्रजीमध्ये मिळतील का, अशी विचारणा होत होती. त्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रकाशन विभागाचे गेल्या चार महिन्यांपासून काम सुरू होते. मुंबई येथील विल्सन कॉलेजमधील इंग्रजीच्या प्राधापक राही डहाके यांनी डॉक्टरांच्या या दहा पुस्तिका इंग्रजीमध्ये अनुवादित केल्या आहेत.
‘अंगात येणे’, ‘सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा’, ‘एक न संपणारा प्रवास’, ‘भुताने झपाटणे’, ‘आध्यात्मिक बुवाबाजी’ अशा विविध विषयांवर दाभोलकर यांनी लेखन केलेल्या पुस्तिकांचा अनुवाद राही डहाके यांनी केला आहे. राही डहाके या ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांची कन्या आहेत. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर दोनशे रुपयांमध्ये या पुस्तिका घरपोच मिळतील. समितीचे दीपक गिरमे आणि प्रकाशन विभागाचे राहुल थोरात यांनी या कामामध्ये मोलाचे योगदान दिले आहे,’ अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डाॅ. हमीद दाभोळकर यांनी दिली.
डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या या दहा पुस्तिका इंग्रजीमध्ये आल्यामुळे त्या देशभर आणि जगभर पोचतील, अशी आशा आहे. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांसाठी या पुस्तिका अत्यंत उपयोगी आहेत. – डाॅ. हमीद दाभोळकर, कार्यकर्ते, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
दोन पुस्तके इंग्रजीमध्ये
डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांची ‘तिमीरातूनी तेजाकडे’ आणि ‘विचार तर कराल’ ही दोन पुस्तके वेस्टलँड पब्लिकेशन्सने इंग्रजीमध्ये अनुवादित केली आहेत. ही पुस्तके वाचकांना उपलब्ध आहेत. तर, उर्वरित पुस्तकांच्या अनुवादाचे काम सुरू करण्यात आले आहे. डाॅ. दाभोळकर यांची आतापर्यंत मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या सर्व १४ पुस्तकांचा हिंदी अनुवाद राजकमल प्रकाशनने यापूर्वीच प्रकाशित केला आहे. डाॅ. दाभोळकर हयात असते तर त्यांनी शनिवारी वयाची ८० वर्षे पूर्ण केली असती. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचे ‘पर्यावरणाचे प्रश्न आणि विवेकी जीवनशैली’ या विषयावर सायंकाळी साडेसहा वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे व्याख्यान होणार आहे, असे डाॅ. हमीद दाभोळकर यांनी सांगितले.




