
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे ‘महिला सक्षमीकरण’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वतीने
‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद १२ आणि १३ सप्टेंबर रोजी हॉटेल विवा, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे होणार आहे.
मार्च २०२४ मध्ये भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) योजनेअंतर्गत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या अनुदानाअंतर्गत महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता पुणेस्थित रमा पुरुषोत्तम फाउंडेशनच्या संचालिका
श्रीमती चित्रा बुझुक यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत पुणेस्थित डॉ. लीना बावडेकर यांचे बीजभाषण होणार
असून, उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पा पटवर्धन भूषविणार आहेत. तसेच परिषदेच्या समारोपप्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर उपस्थित राहणार आहेत.
संशोधक महिलांविषयक विविध प्रश्न आणि पैलूंवर भाष्य करणाऱ्या शोधनिबंधाचे सादरीकरण करणार असून, विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान, स्त्रीशिक्षण, समानता, त्यांचे सक्षमीकरण अशा विविध विषयांवर परिषदेत विचारमंथन होणार आहे. या परिषदेच्या यशस्वी आयोजनाकरिता र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएम-उषा महाविद्यालयीन समन्वयक व शास्त्रशाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. सोनाली कदम आणि अन्य आयोजक सदस्य परिश्रम घेत आहेत.
ही परिषद ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात होणार असून, परिषदेत होणाऱ्या विचारमंथनाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.




