
इंजिन बिघाडामुळे मुंबईची नौका अडकली, अर्नाळ्याच्या समुद्रात कोस्टगार्ड व स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने सुटका!
वसई : मागील काही दिवसांपासून समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वाऱ्याचा फटका मच्छीमारांना बसला आहे. असे असतानाच विरार अर्नाळा येथील समुद्रात मुंबई कुलाबा येथील एका नौका इंजिन बंद पडल्याने दोन दिवस अडकून होती. इंडियन कोस्ट गार्डच्या व स्थानिक मच्छिमार यांच्या नौकेच्या साहाय्याने ती बोट सुखरूप किनाऱ्यावर आणली आहे.
मागील काही दिवसांपासून समुद्रात वादळ निर्माण झाले आहे. या वादळाचा मोठा फटका मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना बसला आहे. मुंबई कुलाबा येथील शिवा भली चौहान यांच्या मालकीची आई तुळजाभवानी नौका इंजिनमध्ये बिघाड झाल्याने समुद्रात अडकली होती. विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यापासून ही बोट जवळपास ११ ते १३ मैल अंतरावर होती. वादळी वारे असल्याने बहुतांश बोटी आधीच किनाऱ्यावर आल्या होत्या. त्यामुळे बंद पडलेल्या बोटीला सहकार्य करण्यासाठी कोणीही नव्हते. त्यामुळे सलग दोन दिवस ही बोट समुद्रातच अडकून होती. इंडियन कोस्ट गार्ड व मत्स्यव्यवसाय विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी त्या बोटीला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. ही बोट अर्नाळा किनाऱ्यापासून काही मैल अंतरावर असल्याचे लक्षात येताच अर्नाळा येथिल मच्छिमार संस्थांना संपर्क साधून मदत उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार अर्नाळा येथील ‘नमो मारिया’ ही नौका व मत्स्यव्यवसाय विभागाची ‘जय जीवदानी’ही गस्ती नौका मदतीसाठी समुद्रात गेली होती.
समुद्रामध्ये वारा व उंच लाटा असल्याने इंडियन कोस्टगार्ड च्या जहाजाने आई तुळजाभवानी या अडकलेल्या नौकेला बाहेर आणले त्यानंतर ‘नमो मारिया’ बोटीला टोइंग करून बंदरात परत आणण्यात आलेली आहे. नौकवरील सर्व खलाशी सुखरूप असल्याची माहिती परवाना अधिकारी विनोद लहारे यांनी सांगितले आहे.
यात परवाना अधिकारी वसई विनोद लहारे, उत्तन परवाना अधिकारी पवन काळे, इंडियन कोस्टगार्ड चे अधिकारी,अर्नाळा येथिल मच्छिमार संस्था, नमो मारिया नौकेचे मालक तसेच सुरक्षा रक्षक यांनीही विशेष सहकार्य केले.




