
रत्नागिरी शहरातील सध्याची डांबरीकरणाची कामे म्हणजे जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक-बाळ माने
रत्नागिरी शहरात सध्या डांबरीकरणाची कामे सुरू आहेत, ती केवळ निवडणूक आली म्हणून जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे. लोकांना बदल हवा आहे. महायुतीची नौका ओव्हरलोड झाली आहे. पूर्वीचा भाजपा इन्कमिंग होता. आता त्यांच्यातली आऊट गोइंग सुरू होऊन भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षातले शिंदेसेनेसारख्या राज्यातल्या छोट्या पक्षामध्ये येत आहेत. याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. रत्नागिरीत दुसरा पर्याय नाही असे म्हटले जात होते. आता उद्धवसेनेच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व महाविकास आघाडी म्हणून सज्ज झालो आहे. त्यामुळे जनतेने मताच्या रूपाने आशिर्वाद द्यावा, असे आवाहन शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उपनेते बाळ माने यांनी व्यक्त केले.
निवडणुकीतील ज्वलंत मुद्दा उपस्थित करत माने यांनी डांबर घोटाळ्याशी संबंधित ४४ कोटी रुपयांचे व्हाऊचर निवडणुकीपूर्वी जनतेसमोर जाहीर करावे, असे थेट आव्हान पालकमंत्री उदय सामंत यांना दिले. नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांच्या जागाही महाविकास आघाडी मोठ्या मताधिक्याने निवडून आणेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रमोद शेरे, राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) नेते मिलिंद कीर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसेचे) जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, बहुजन विकास आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले, “महायुतीतून ‘आउटगोईंग’ (निर्गमन) सुरू झाले आहे आणि निष्ठावंत कार्यकर्ते आमच्या पक्षाकडे येत आहेत. विकसित रत्नागिरी कशी होती आणि चांगले सत्ताधारी कसे होते हे आम्ही जनतेला दाखवू. वर्षानुवर्षे न होणारे रस्ते पुढच्या सहा महिन्यात करून दाखवू. तसेच त्यांची टिकावूपणा १० वर्षांचा असेल. सहा महिने आणि १० महिन्यांची डीएलपी आमची नसेल, ड्रेनेज सिस्टीम राहिल, पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू असे आजार अस्वच्छतेमुळे झालेले आहेत. आरोग्यसेवेसाठी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलही रत्नागिरीकरांसाठी देणार आहोत.”
पालकमंत्री उदय सामंत हे स्ट्राँग असते, तर त्यांचे उमेदवार केव्हाच जाहीर व्हायला पाहिजे होते. त्यांच्यावर उमेदवार सोमवारी पहाटे जाहीर करण्याची वेळ आली. याचा अर्थ कोण स्ट्राँग आहे, हे जनतेने ठरवले आहे. मित्र पक्षाचे उमेदवार पक्षात घेऊन आपला धनुष्यबाण उभं करण्याची रात्रभर लढाई सुरू होती. यातच त्यांची दमछाक झालेली आहे, असा टोला माने यांनी लगावला. तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवानी माने आणि सर्व उमेदवारांना मतदार विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, “९९ किलो मीटरची पदयात्रा आम्ही केली. त्यामध्ये रत्नागिरीतील रस्त्यांची दुर्दशा, स्वच्छ भारत अभियानाची दुर्दशा असेल, पिण्याच्या पाण्यासंदर्भातल्या अडचणी असतील, मोकाट जनावरांचे प्रश्न असे अनेक प्रश्न या ठिकाणी माझ्या आणि सहकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहेत. आता महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण असणार आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, वंचित आघाडी, रिपब्लिकन पार्टी, बहुजन समाज पार्टी, मनसे व इतर सर्व सहकारी पक्षाचे पदाधिकारी येथे सहभागी झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी व्यापक झाली आहे,” असेही माने म्हणाले.
बाळ माने यांनी महाविकास आघाडीच्या वाढत्या ताकदीचे प्रदर्शन केले. महाविकास आघाडीला आता रत्नागिरीत केवळ काँग्रेस-राष्ट्रवादी (पवार गट) नव्हे, तर रिपब्लिकन पार्टी, वंचित आघाडी, बहुजन समाज पार्टी (बसपा) आणि महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) देखील जाहीर पाठिंबा दिला असल्याने आमचे संघटन आणखी मजबूत झाल्याचे त्यांनी सांगितले.




