गणपतीपुळे येथील समुद्रात तीन जण बुडाले , मुंबईतील तरुणाचा मृत्यू दोघांना वाचवण्यात यश,


गणपतीपुळे येथील समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटना घडत आहेत वारंवार सूचना करूनही पर्यटक खोल समुद्रात जात असल्याने अशा घटना घडत आहेत
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी (वय वर्षे २६) राहणार मानखुर्द मुंबई असे त्याचे नाव आहे. तर भीमराज आगाळे (वय वर्षे २४) राहणार कल्याण मुंबई आणि विवेक शेलार (वय वर्षे २५) राहणार विद्याविहार मुंबई येथील या दोन तरुणांना वाचविण्यात स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यवसायिक, जीवरक्षक, पोलीस व ग्रामस्थ यांना यश आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथून आदर्श धनगर राहणार गोवंडी मुंबई वय वर्षे २६ , प्रफुल्ल त्रिमुखी राहणार मानखुर्द मुंबई वय वर्षे २६ ,सिद्धेश काजवे राहणार परेल लालबाग मुंबई वय वर्षे २५, भीमराज आगाळे राहणार कल्याण मुंबई वय वर्षे २४ व विवेक शेलार राहणार विद्याविहार मुंबई वय वर्षे २५ असे कॉलेजमध्ये मित्र असणारे पाच तरुण देवदर्शन व पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे सकाळच्या सुमारास आले होते. हे पाच तरुण गणपतीपुळे येथे एका खाजगी लॉज मध्ये निवासासाठी उतरले होते. यावेळी या तरुणांनी दुपारनंतर समुद्रात आंघोळीसाठी जाण्याचे ठरवल्यानंतर ते आंघोळीसाठी समुद्रात उतरले होते. यावेळी सायंकाळी उशिरापर्यंत त्यांनी समुद्रस्नान करण्याचा प्रयत्न केला असता त्यातील प्रफुल्ल त्रिमुखी, भीमराज आगाळे आणि विवेक शेलार या तीन तरुणांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला असता ते बुडू लागले. यावेळी त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आरडाओरडा केला असता समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मोरया वॉटर स्पोर्ट व्यवसायिक व जीवरक्षक यांनी समुद्रात उडी घेऊन या तिन्ही तरुणांना समुद्राच्या पाण्याबाहेर काढले.

त्यानंतर तत्काळ गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने त्यांना मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता प्रफुल्ल त्रिमुखी हा मृत झाल्याचे घोषीत केले तर भीमराज आगाळे आणि विवेक शेलार यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येऊन अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button