
इटलीमध्ये जलस्रोत बाधित केल्यामुळे बंद करण्यात आलेल्या मिटेनी कंपनीची उपकरणे आणि कायमचे रसायन बनवण्याची प्रक्रिया आता लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीकडे
इटलीमध्ये तब्बल साडेतीन लाख लोक राहणाऱ्या भागातील जलस्रोत बाधित केल्यामुळे बंद करण्यात आलेल्या मिटेनी कंपनीची उपकरणे आणि कायमचे रसायन (फॉरएव्हर केमिकल) बनवण्याची प्रक्रिया आता लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीकडे आहे.पर्यावरणीयदृष्ट्या आणि त्यामुळे मानवी आरोग्यासाठी ही रसायने घातक असल्याने प्रदूषणाचे मोठे संकट भविष्यात लोटे आणि परिसरावर येण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, भारतीय पर्यावरण यंत्रणा याकडे अजूनही दुर्लक्ष करत आहेत.
औद्योगिक वसाहतीमधील विशेषत: रासायनिक प्रकल्प असलेल्या औद्योगिक वसाहतींमधील प्रदूषण ही गेल्या काही वर्षांतील गंभीर समस्या झाली आहे. लाेटे औद्योगिक वसाहतीत गेल्या काही वर्षांत झालेले स्फोट आणि त्यात मृत आणि जखमी झालेले कामगार हा चिंतेचा विषय आहेच. मात्र, त्याहीपेक्षा परिसरातील जलप्रदूषण, हवेतील प्रदूषण आणि मानवी आरोग्यावर होणारे परिणाम याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. दुर्दैवाने याबाबत सातत्याने लक्ष देणारी, अभ्यास करणारी कोणतीही यंत्रणा नाही.
लोटे येथे गेल्या तीन-चार वर्षांत सुरू झालेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने इटलीतील ज्या कंपनीकडून उपकरणे घेतली आहेत, ती मिटेनी कंपनी इटलीतील विसेन्झा या शहरात होती. प्रदूषणाच्या कारणामुळे ती कंपनी बंद करण्यात आली आहे. २०१८ मध्येच ही कंपनी बंद झाली. त्या कंपनीच्या संचालकांवर खटला दाखल झाला. जूनमध्ये विसेन्झीच्या न्यायालयाने पर्यावरण प्रदूषण आणि इतर कारणांसाठी या कंपनीच्या संचालकांना आणि अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. या कंपनीची सर्व उपकरणे आणि त्यातील प्रक्रिया भारतातील लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीची उपकंपनी असलेल्या व्हिवा लाइफ सायन्सेसने लिलावात खरेदी केली आहे. लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने नुकतेच कायमचे रसायन बनवण्याचे उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात इटलीप्रमाणेच लोटे आणि परिसरातील अनेक गावांना जल प्रदूषणाचा धोका आहे.




