
राज्यसेवा २०२४ परीक्षेचा निकाल जाहीर, विजय लमकणे राज्यात पहिला
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालानंतर मुलाखती घेण्यात आल्या. १ हजार ५१६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. ३० ऑक्टोबरपर्यंत या मुलाखती चालल्या असून रात्री निकाल जाहीर करण्यात आला.
यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लमकणे राज्यात पहिला आला आहे. तर हिमालय घोरपडे राज्यातून दुसरा आला आहे. एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली. निकालासह पात्रतागुणही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे विजय नागनाथ लमकणे यांची यापूर्वही एमपीएससीमधून विविध सेवांसाठी निवड झाली आहे. विजय लमकणे सध्या गटविकास अधिकारी या पदावर ते कार्यरत आहेत.
एमपीएससीतर्फे २७ ते २९ मे या कालावधीत राज्य सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर मुलाखती घेण्यात आल्या. मुख्य परीक्षेमधून मुलाखतीकरीता अर्हताप्राप्त न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपुस्तिकेतील गुणांची फेरपडताळणी करायची असल्यास संबंधित उमेदवारांनी गुणपत्रके प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक होते. परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या समांतर आरक्षणाच्या, तसेच अन्य मुद्यांसंदर्भात विविध न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले.




