रत्नागिरीतील बुद्धिबळपटूंची राज्यस्तरावर धडक

आयुष रायकर , निधी मुळ्ये यांची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा , चेस असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यात नुकत्याच कोल्हापूर विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. रत्नागिरीतील २ बुद्धिबळपटूंनी या स्पर्धांत चमकदार कामगिरी करीत राज्यस्तरावर धडक मारली.

१४ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत पटवर्धन हायस्कूल मध्ये इयत्ता सहावीचा विद्यार्थी असलेल्या आयुष रायकर याने सहा फेऱ्यांमध्ये पाच गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्वतः बिगरमानांकित असलेल्या आयुषने स्पर्धेत एकूण पाच फिडे मानांकित खेळाडूंचा पराभव केला. पहिल्यांदाच विभागीय स्पर्धेत सहभागी होत असून देखील आयुषने राज्यस्तरावर धडक मारली आहे.

१७ वर्षांखालील वयोगटाच्या मुलींच्या स्पर्धेत रत्नागिरीतील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या निधी मुळ्ये हिने सहा फेऱ्यांमध्ये साडेचार गुणांसह तृतीय स्थान पटकावले. निधीने संपूर्ण स्पर्धेत अपराजित रहात तीन सामने जिंकले व तीन बरोबरीत सोडवले. पंधरावे मानांकन असलेल्या निधीने स्वतःपेक्षा अधिक फिडे मानांकन असलेल्या अनेक खेळाडूंविरुद्ध चांगली लढत दिली.

आयुष व निधी रत्नागिरी येथील बुद्धिबळ प्रशिक्षक चैतन्य भिडे यांच्या मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमी मध्ये बुद्धिबळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतात. सातारा येथेच दि. १२ ते १४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत दोघेही रत्नागिरी जिल्ह्याचे विभागातर्फे प्रतिनिधित्व करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button