
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील भोस्ते घाटातील अपघात प्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील भोस्ते घाट वेरळ फाट्याच्या अलीकडील डायव्हर्शन पॉइंटवर २८ ऑक्टोबर रोजी एका कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडला. कंटेनर चालकाने भरधाव आणि बेदरकारपणे वाहन चालवून आधी एका बोलेरो कॅम्परला धडक दिली, त्यानंतर कंटेनर रस्त्यावर उलटून तो एका स्वीफ्ट डिझायर कारवर आदळला. या अपघातात मुंबईहून आलेल्या कुटुंबातील एक महिला जखमी झाली असून, कंटेनर चालकाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील सीजीएस कॉलनी, कानेनगर येथील रहिवासी सुरेंद्रशिवनाथ प्रसाद केसरी (वय ५२) यांनी या अपघाताबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी केसरी हे त्यांच्या कुटुंबासह स्वीफ्ट डिझायर कार क्रमांक एम.एच.०१/सी.टी/००८६ मधून गोवा ते मुंबई असा प्रवास करत असताना हा अपघात झाला.
सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास, त्यांची कार भोस्ते घाट उतरून वेरळ फाट्याजवळील हायवेवरील डायव्हर्शनच्या ठिकाणी पोहोचली. आरोपी कंटेनर चालक सिराज एहमद मोहम्मद शरीफखान (वय ३८) हा कंटेनर क्रमांक एम.एच. ४६/बी.बी./२८१३ भरधाव वेगात चालवत होता.
सिराजखान याने बेदरकारपणे कंटेनर चालवून प्रथम एका बोलेरो कॅम्पर गाडीला धडक दिली, ज्यामुळे त्या गाडीचे नुकसान झाले. त्यानंतर, कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यामुळे तो रस्त्याच्या मध्यभागी आपल्या डाव्या कुशीवर उलटला. उलटलेला कंटेनर थेट फिर्यादी सुरेंद्र केसरी यांच्या स्वीफ्ट डिझायर कारच्या मागील बाजूस आदळला, ज्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले. या धडकेत स्वीफ्ट कारमध्ये बसलेल्या सुरेंद्र केसरी यांच्या पत्नी, ज्युली केसरी (वय ४५) यांच्या डोक्याला गंभीर मुकामार लागून त्या जखमी झाल्या.
या घटनेनंतर जखमी ज्युली केसरी यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले



