
मसाला पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेतजिल्हा मध्यवर्ती फळरोपवाटिका तथा कृषी चिकित्सालयाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
रत्नागिरी, दि. 31 ) : आंबा, काजू, नारळ, सुपारी यांच्या जोडीनेच दालचिनी, मिरी, लवंग अशा मसाला पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी व्यक्त केली.
पोमेंडी येथील कृषी विभागाच्या जिल्हा मध्यवर्ती फळरोपवाटिका तथा कृषी चिकित्सालयाला जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी काल सायंकाळी भेट दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, प्रांताधिकारी जीवन देसाई, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, गुणनियंत्रक अधिकारी राजेंद्र कुंभार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी काजू, आंबा, दालचिनी, नारळ, सुपारी आदींच्या रोपांची पहाणी करुन माहिती घेतली. ते म्हणाले, केरळच्या धर्तीवर आपल्या जिल्ह्यामध्ये मसाल्यांच्या पदार्थांची शेती वाढवायला हरकत नाही. केरळ इतकेच किंबहुना त्याहूनही अधिक चांगले वातावरण आपल्या जिल्ह्यात कोकण पट्ट्यात आहे. कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. हे क्षेत्र अधिक वाढेल याबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.
गुणनियंत्रक निरीक्षक श्री. कुंभार यांनी यावेळी फळरोपवाटिकेविषयी सविस्तर माहिती दिली.
रोपवाटिकेपासून दरवर्षी 75 ते 80 लाख महसूल
जिल्हा मध्यवर्ती फळरोपवाटिका पोमेंडी एकूण क्षेत्र 12.81 हेक्टर रोपवाटिका प्रक्षेत्रावर नारळ मातृवृक्ष संख्या 1000 यामध्ये समाविष्ट जाती – बाणावली, ग्रीनडॉर्फ, ऑरेंज डॉर्फ, यलो डॉर्फ, कोकण भाट्ये, टी डी, डी टी, केरा संकर इत्यादी जातीचे नारळ मातृवृक्ष असून, त्यापासून रोपे निर्मिती केली जाते. तसेच उपलब्ध शिल्लक बियाणे महाराष्ट्रातील इतर शासकीय रोपवाटिकांना नारळ रोपे निर्मितीसाठी पुरवठा केले जाते.
आंबा कलमे मातृवृक्ष 250 जात हापूस, पायरी, रत्ना, सिंधू, गोवा मानकुर, जॉर्ज, नीलम, केंट, सुवर्णरेखा, दूध पेढा या जाती असून, या सर्व जातीची आंबा कलमे रोपवाटिका प्रक्षेत्रावर उपलब्ध आहेत. काजू कलमे मातृवृक्ष ची संख्या 600 असून, त्यामध्ये समाविष्ट जात वेंगुर्ला ४, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 8 या जाती असून, त्यापासून कलमे निर्मिती केली जाते.
तसेच सुपारी मातृवृक्ष संख्या 135 जात श्रीवर्धन रोठा चिकू कलमे मातृवृक्ष संख्या 35 जात कालीपत्ती त्याचबरोबर दालचिनी, कोकम, काळी मिरी इत्यादी झाडांचे मातृवृक्ष रोपवाटिका प्रक्षेत्रावर आहेत. त्याचबरोबर कलमे रोपे निर्मितीसाठी पॉलिहाऊस, नेट हाऊस हार्डनिंग शेड, या सुविधा उपलब्ध असून, सर्व रोपवाटिकेवरील मातृवृक्ष आणि सर्व शेड यांना ठिबक सिंचन व तुषार सिंचन ही सुविधा उपलब्ध आहे. रोपवाटिका प्रक्षेत्रावर पाणी व माती परीक्षण लॅब सुद्धा आहे.
रोपवाटिकेवरील मातृ वृक्षांना पाण्याची कमतरता भासू नये, याकरिता 50 लाख लिटरक्षमतेचे प्लास्टिक अच्छादनाचे शेततळे सुद्धा आहे. सध्या रोपवाटिकेवर सर्व प्रकारचे नारळरोपे, आंबा कलमे, चिकू कलमे, काजू कलमे, दालचिनी सुपारी रोपे उपलब्ध आहेत. ही रोपवाटिका राज्यात प्रथम क्रमांकाची असून, या रोपवाटिकेपासून दरवर्षी 75 ते 80 लाख रुपये इतका महसूल कलमे रोपे विक्रीतून जमा होतो.
000




