भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयासह महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश


भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयासह महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गत विजेत्या ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना ३३८ धावा केल्या होत्या.पण सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला या धावासंख्येचा बचाव करता आला नाही. भारतीय महिला संघाने ९ चेंडू आणि ५ विकेट्स राखून दिमाखात फायनल गाठली. हरमनप्रीत कौरच्या ८९ धावांच्या खेळीसह जेमिमा रॉड्रिग्जच्या १२७ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विक्रमी विजय नोंदवत पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याच्या दिशेनं पाऊल टाकले आहे. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो.भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला क्रिकेटमध्ये अच्छे दिन आल्याची पहिली झलक या लढतीनंतर पाहायला मिळाली. भारताच्या ‘वुमन इन ब्लू’ च्या या दमदार कामगिरीनंतर दिग्गज क्रिकेटपटूंनी महिला संघाच्या कामगिरीवर आपल्या भावना व्यक्त करत संघातील खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सचिन तेंडुलकर, युवराज सिंगसह क्रिकेटच्या मैदानातील दादा अर्थात सौरव गांगुली आणि भारतीय पुरुष संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज ए. बी. डी. विलियर्स यांनी ऑस्ट्रेलियावरील या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button