
सभांना गर्दी होते तरीही पराभव का होतो? राज ठाकरेंनी सांगितलं कारण
- मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ईव्हीएममध्ये होणाऱ्या गैरप्रकारांवर भाष्य केले आहे. तसेच अक्षित उपाध्याय यांनी ईव्हीएममधील मतचोरीबाबत सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी ईव्हीएममध्ये हॅकिंगने नव्हे तर प्रोग्रॅमिंगने गैरप्रकार केले जात असल्याचा दावा केला.
या संपूर्ण प्रकरणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “मी गेली अनेक वर्षे हे ओरडून सांगतोय. मागे आपले शिबिर झाले तेव्हाही मी सांगितले होते की, लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, पण त्याचे मतांमध्ये परिवर्तन होत नाही. लोक आपल्याला मतदान करत आहेत. पण हे जे गेल्या दहा-बारा वर्षांपासून सुरू झाले आहे, या भानगडींमुळे आपल्याला पराभव पत्करावा लागतो. अनेकांना वाटेल की, मी कारणे देतोय. कारणे काय द्यायची आहेत, याबाबत अख्खा देश बोंबलत आहे.”
ते पुढे म्हणाले की, “या सगळ्या प्रक्रियेतून सत्तेमध्ये यायचे आणि हवी तशी सत्ता राबवायची. पाच वर्षं झाली महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. यासाठी आणखी एक वर्ष लागले तरी चालेल, पण मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत. एक वर्ष निवडणुका लांबल्याने काही फरक पडणार नाही. ज्यावेळी मतदार याद्या दुरुस्त केल्या जातील, त्यानंतर कोणाचाही जय-पराजय झाला तरी ते आम्हाला मान्य असेल. मतदार याद्या दुरुस्त केल्यानंतर आज सत्तेत आहेत त्यांचा विजय झाला तरी तो आम्हाला मान्य असेल.”
यावेळी निवडणुकांतील गैरप्रकारांची मॅच फिक्सिंगशी तुलना करताना राज ठाकरे म्हणाले की, “आपल्या क्रिकेटमध्ये ज्यावेळी मॅच फिक्सिंग झाले होते, त्यावेळी अझरुद्दीन ते जडेजापर्यंत सर्वांना काढून टाकले. पण इथे कोणालाच काढत नाहीत. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणतात की, मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज प्रायव्हेट असतात. यात प्रायव्हसी कसली आली? जी पटत नाहीत अशी काहीतरी उत्तरे द्यायची आणि या सर्व भानगडीतून निवडणुका घ्यायच्या. यातून सत्तेत आल्यानंतर वेडेवाकडे आणि कसेही वागायचे.”




