राज्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाचा इशारा


काही दिवसांपासून राज्यावर पावसाचे संकट असून मॉन्सून जाऊनही सतत राज्यात पाऊस सुरू आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाचा इशारा आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसाला सुरूवात झालीये.मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव राज्यात बघायला मिळत आहे. आंध्रप्रदेश आणि ओडिसामध्ये पावसाने थैमान घातलंय. राज्यात सध्या वाऱ्यासह पाऊस सुरू आहे, या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झालंय. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दोन दिवस कोकणकिनारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मोंथा चक्रीवादळ मंगळवारी रात्रीच एक वाजता आंध्रप्रदेशच्या किनारी धडकले. पावसासोबतच वाऱ्याचा वेग प्रचंड होता.

आता मोंथा वादळाचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले. त्याचा प्रवास मध्य प्रदेशच्या दिशेने सुरू असून, गुरुवारी हे क्षेत्र विदर्भालगत असेल. शुक्रवारी त्याचा प्रवास मध्य प्रदेशच्या दिशेने सुरू राहील आणि त्याच दिवशी हे क्षेत्र युपी, बिहारच्या दिशेने सरकत सिक्कीमकडे वाटचाल करेल. त्यामुळे पुढील तीन दिवस या परिसरात पावसाची शक्यता आहे. वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचे संकेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button