रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे रोलर कोस्टर सायक्लोथॉनच्या तिसऱ्या पर्वाचे २ नोव्हेंबरला आयोजन

रत्नागिरी : कोकणात क्रीडा पर्यटनाच्या वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने सलग तिसऱ्या वर्षी रोलर कोस्टर सायक्लोथॉनचे आयोजन रविवार दि. २ नोव्हेंबर रोजी केले आहे. भाट्ये ते गावखडी व परत अशा ५० किमीच्या या स्पर्धेत देशभरातील २०० हून अधिक सायकलपट्टू सहभागी होणार आहेत. यंदा प्रथमच शालेय विद्यार्थ्यांसाठी २५ किमीचा गटही ठेवण्यात आला आहे. सलग तिसऱ्या या स्पर्धेसाठी वर्षीही हॉटेल विवेकने बहुमोल सहकार्य केले आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने आज पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली.

या स्पर्धेसाठी सुवर्णसूर्य फाउंडेशन सहप्रायोजक असून अॅपरल पार्टनर टिलेज, असोसिएट पार्टनर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, ट्रॉफी पार्टनर खेडशीचे माजी सरपंच निरंजन सुर्वे, एनर्जी पार्टनर इनर्झल, एचटूओ पार्टनर अॅड प्लस, न्युट्रिशन पार्टनर बॉन अपेटाईट यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.

हॉटेल विवेक येथे झालेल्या पत्रकार परिषदेला रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत, प्रसाद देवस्थळी, डॉ. नितीन सनगर, दर्शन जाधव, विनायक पावसकर, अॅड. सचिन नाचणकर, प्रसाद हातखंबकर, अभिजित पड्याळ, विशाल भोसले, प्रथमेश प्रभुदेसाई आदी उपस्थित होते.

भाट्ये येथून सकाळी ६ वाजता स्पर्धेचे उद्घाटन सन्माननीय जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते होईल व १० वाजता विवेक हॉटेल येथे राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदयजी सामंत यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.

स्पर्धकांना १ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजल्यापासून हॉटेल विवेक येथे बिब नंबरचे वितरण केले जाणार आहे. या वेळी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सायकलपट्टू व धावपट्टूंनी गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना सन्मानित केले जाणार आहे.

रोलर कोस्टर सायक्लोथॉनमध्ये पुरुष व महिलांसाठी ११ ते १७ वयोगटातील मुले, १८ ते ३५ वयोगट एलाईट ग्रुप, ३६ ते ५० वयाचा मास्टर ग्रुप आणि ५१ च्या वरील ज्येष्ठ नागरिकांचे स्वतंत्र गट ठेवले आहेत. यातील विजेत्यांना १ लाख ७५ हजार रुपयांची बक्षीसे, चषक, स्पर्धा वेळेत पूर्ण करणाऱ्यांना आकर्षक पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत देशभरातील स्पर्धक सहभागी होत असून स्पर्धकांची राहण्याची आणि जेवण, नाश्त्याची व्यवस्था हॉटेल विवेकच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरीतील विविध संस्था, व्यक्तींनी या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य केले आहे. त्यामुळे ही स्पर्धा क्लबपुरती मर्यादित न राहता समस्त रत्नागिरीकरांची झाली आहे.

”जो दिमाग से खेलेगा वही जितेगा” अशी स्पर्धेची टॅगलाईन आहे. भाट्ये येथून स्पर्धा सुरू होईल व कसोप, फणसोप, वायंगणी, गोळप, पावस, मेर्वी, गावखडी या मार्गावरून पुन्हा याच मार्गाने पुन्हा भाट्यात संपणार आहे. शालेय गटासाठी भाट्ये ते गोळप धार व तिथून परत भाट्ये असा मार्ग आहे. मार्गावर विविध ठिकाणी पाणी, सरबताची व्यवस्था तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या सहयोगाने ढोल-ताशांच्या गजरात स्पर्धकांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे जय हनुमान मित्र मंडळ देखील रूट सपोर्ट करणार आहे.

स्पर्धेच्या मार्गावरील खड्ड्यांची डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. तसेच मार्गावर जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णवाहिका व डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे.

रत्नागिरीची ओळख सायकल डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया व्हावी, उत्तमोत्तम सायकलपटू तयार व्हावेत, ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ किंवा आशियायी गेम्ससारख्या खेळात सायकलिंगमध्ये भारताने पदकांची लयलूट करावी आणि त्याचबरोबरीने सायकल टुरिझम वाढून सायकलचा उपयोग अर्थार्जनासाठी व्हावा या हेतूने ही स्पर्धा महत्त्वाची आहे. सर्व रत्नागिरीकरांनी या सायकल स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी २ नोव्हेंबरला पहाटे ६:०० वाजता भाट्ये येथे उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button