
मोंथा’ चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर
’
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ’मोंथा’ चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसून आला असून समुद्रही खवळला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने देवगड बंदरात दाखल झालेल्या शेकडो नौकांचा मुक्काम वाढला असून खोल समुद्रातील मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. किनारपट्टी भागात मंगळवारी वातावरण ढगाळ राहिले होते. दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा वादळसदृश स्थिती उद्भवणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली असून समुद्रातील वातावरण
पूर्णतः निवळल्यानंतरच खोल समुद्रातील मासेमारी सुरू होईल, अशी माहिती स्थानिक मच्छीमार विकास कोयंडे यांनी दिली.
बंगालचा उपसागर व अरबी समुद्र या दोन्ही समुद्रात सध्या हवामान सातत्याने बदलत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने ’मींथा’ चक्रीवादळ निर्माण झाले असून त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसून आला आहे.
समुद्र मोठ्या प्रमाणात खवळला असून उंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने देवगड बंदरात दाखल झालेल्या शेकडो नौकांचा मुक्काम वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून या नौका समुद्रातील वादळसदृश स्थितीमुळे देवगड बंदराच्या आश्रयास आल्या होत्या. त्या माघारी जाण्यापूर्वीच पुन्हा समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने हवामान विभागाने खोल समुद्रात मासेमारीस न जाण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच किनारपट्टी भागातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन केले आहे. सध्या देवगड बंदरात स्थानिक नौकांसह गुजरात, डहाणू मालवण भागातील नौका आश्रयास आहेत.www.konkantoday.com




