
गणपतीपुळे किनार्यावर जेलीफिशचा उपद्रव
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दिवाळी सुट्टीसह पर्यटन हंगाम सुरू असताना येथील समुद्रकिनार्यावर भाविक तसेच पर्यटकांची गर्दी झालेली दिसून येत आहे. पर्यटकांना येथील समुद्रकिनार्याची भुरळ पडत असून, विलोभनीय समुद्रकिनारा व पाण्याचा मोह आवरता येत नाही. अशातच सध्या येथील समुद्रकिनार्यावर जेलीफिश वाहून येत आहेत.
समुद्रस्नान करताना पाण्यामध्ये असलेल्या जेलीफिशचा स्पर्श होऊ लागल्यामुळे अनेक पर्यटक हैराण झाले आहेत. व्यावसायिकांकडून देण्यात येणार्या माहितीनुसार जेलीफिशचा स्पर्श होताच अंगाला वेदना होतात. स्पर्शामुळे अंगावर बारीक पुरळ व स्पर्श झालेल्या ठिकाणचा भाग लालेलाल होतो. तसेच स्पर्श झाल्याने वेदनेमुळे पर्यटक त्या ठिकाणी हाताने चोळतात. त्यामुळे आणखीनच त्रास होतो. जेलीफिशशी संपर्क आल्यास काहीवेळा चार ते पाच तास वेदना होतात तर काहींना तापही येतो. त्यामुळे जेलीफिशचा स्पर्श झाल्यास व लागल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. सध्या किनार्यावर जेलीफिशचे अस्तित्व आढळल्याने पर्यटक तसेच भाविकांनी समुद्रात जेलीफिश ज्या ठिकाणी असतील तेथे पाण्यात उतरू नये, असे आवाहन स्थानिक ग्रामस्थ, किनार्यावरील -व्यावसायिक, ग्रामपंचायत, देवस्थान समिती आणि पोलीस यंत्रणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com




