
खेड तालुक्यातील पोसरे-बौद्धवाडी येथे चार वर्षानंतरही दरडग्रस्त हक्काच्या घराविना
खेड तालुक्यातील पोसरे-बौद्धवाडी येथील ७ घरांवर दरड कोसळून १७ जणांना हकनाक प्राणास मुकावे लागले. या दुर्घटनेस ४ वर्षांचा कालावधी लोटूनही अजूनही दरडग्रस्तांना हक्काचे घर मिळालेले नाही. प्रशासन पुनर्वसनाचे कागदी घोडे रंगवण्यातच दंग आहे. असगणीतील पुनर्वसनाचा प्रश्नही शासन दरबारी लालफितीत अडकून पडला आहे. यामुळे पुनर्वसनाचे आश्वासन हवेत विरल्याने दरडग्रस्त ४ वर्षानंतरही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.
२२ जुलै २०२१ रोजी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पोसरे-बौद्धवाडीवर नियतीने झडप घातली. यादिवशी रात्रीच्या सुमारास डोंगराचा भाग बौद्धवाडीतील घरांवर कोसळून ७ घरे दरडीखाली गाडली गेली. या दुर्घटनेत तब्बल १७ जणांना काळाने गिळंकृत केले. या दुर्घटनेनंतर दरडग्रस्त ग्रामस्थांचे तातडीने पुनर्वसन करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र ४ वर्षे लोटून देखील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजमितीसही धूळखात पडला आहे.
दरडग्रस्तांना अद्यापही त्यांच्या हक्काची घरे उपलब्ध झालेली नाहीत. शासनदरबारी खेटे घालूनही पदरी निराशा पडत आहे. प्रशासन केवळ कागदी घोडे रंगवून दरडग्रस्तांची बोळवण करत असल्याचा सूर आळवला जात आहे. दोन-तीन वेळा दरडग्रस्तांसह तालुका बौद्ध समाज सेवा संघाने आक्रमकतेचा अवलंब करत आंदोलनाचा मार्ग पत्करल्यानंतर प्रशासनाने पुनर्वसनासाठी जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली.
या दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी असगणी येथे जागेची निश्चिती करत येथील तहसील कार्यालयाकडून तसा प्रस्तावही कोकण भवन येथे पाठवण्यात आला आहे. मात्र हा प्रस्ताव तेथे धूळखातच पडला आहे. ४ वर्षे लोटूनही हक्काची घरे दरडग्रस्तांना उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने त्यांच्यावर निर्वासित होण्याची वेळ येवून ठेपली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाचा पावसाळाही दरडग्रस्त ग्रामस्थांनी दुसर्याच्या
ओसरीवर घालवला. प्रशासन आमचे पुनर्वसन नेमके करणार तरी कधी, असा सवाल दरडग्रस्तांकडून उपस्थित केला जात आहे.www.konkantoday.com




