
ऑडिशनला आलेल्या 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या माथेफिरूचा पोलिसांकडून एन्काऊंटर
मुंबईतील 17 मुलांना पोलीस ठेवणाऱ्या माथेफिरूचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे
मुंबईच्या पवई परिसरातील स्टुडिओत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहितचा मृत्यू झाला असून रोहितने ओलीस ठेवलेल्या 17 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.पवईतील महावीर क्लासिक येथे आर ए स्टुडिओ असून रोहित आर्य या माथेफिरूने ऑडिशनसाठी मुलांना बोलावलं होतं. गुरुवारी दुपारी ऑडिशनसाठी 17 मुलांना रोहितने ओलीस ठेवले. वेबसीरिजच्या ऑडिशनसाठी ही सर्व मुलं 10 ते 12 या वयोगटातील होती. यानंतर रोहितने मुलांच्या पालकांना व्हिडिओ पाठवले होते.रोहितने व्हिडिओमध्ये म्हटले होते की, मला काही सांगायचंय. माझं नाव रोहित आर्य आहे. मला बोलू दिलं नाही तर मी सगळं जाळून टाकीन. मी दहशतवादी नाही, मला पैसे नको, पण मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरे मिळायली हवीत, बाकी काही नको, असं त्यानं म्हटलं होतं.ऑडिशनसाठी गेलेली मुलं जेवणाच्या ब्रेकसाठी बाहेर आली नव्हती. त्यामुळे पालकांना शंका आली होती. यानंतर रोहितने व्हिडिओ पाठवल्याने मुलांना ओलीस ठेवल्याचे पालकांना समजले आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली.
सर्व मुलांची सुखरुप सुटका
घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. रोहितकडे एअर गन असल्याची माहिती सूत्रांनी पुढारी न्यूजला दिली. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी एक गोळी रोहितच्या दिशेने झाडली. ही गोळी रोहितच्या छातीत लागली आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, पवईतील आर.ए. स्टुडिओमध्ये अडकलेली सर्व मुले सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली आहेत. पोलिसांनी स्टुडिओमध्ये बाथरूमच्या मार्गाने आत प्रवेश केला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही मुले मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या एका शूटिंग ऑडिशनसाठी बोलावण्यात आली होती. सुटका केलेल्यांमध्ये 17 मुलं, एक महिला आणि एका ज्येष्ठ नागरिकाचा समावेश असून सर्वांना तपासणीसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




