
अत्याधुनिक गाडीच मृत्यूला कारणीभूत ठरली, ताम्हिणी घाटात पुण्याहून माणगावला निघालेल्या कारचा सनरूफ तोडून दगड गाडीतील महिलेच्या डोक्याला लागून महिलेचा मृत्यू
ताम्हिणी घाट परिसरात सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाने छोटे-मोठे दगड रस्त्यावर कोसळत आहेत. यातीलच एक दगड पुण्याहून माणगावला निघालेल्या कारचा सनरूफ तोडून आतमध्ये घुसला आणि महिलेच्या डोक्याला मार लागला व तिचा मृत्यू झाला
मृत महिलेचे नाव स्नेहल गुजराती असे आहे त्या ४२ वर्षांच्या होत्या. आज सकाळी पुणे-रायगड जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातून त्या प्रवास करत होत्या. घाटमार्गावर जोरदार पाऊस सुरू असताना अचानक डोंगरावरून छोटे मोठे दगड खाली पडत होते. काही दगड गुजराती यांच्या कारच्या टपावर आदळले. यातील एक दगड कारच्या सनरुफची काच फोडून थेट आतमध्ये घुसला. दगड डोक्यात लागल्याने स्नेहल यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा मुलगा आणि पती किरकोळ जखमी झाले आहेत.
स्नेहल यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले, परंतू त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पावसामुळे या भागात भूस्खलनाच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांनी अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय घाटातून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने या घटनेनंतर तात्काळ सुरक्षा उपाययोजना आणि रस्त्यांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.




