
रत्नागिरी पोलीस दलामार्फत ३१ ऑक्टोबर रोजी “एकता दौड”
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजन
रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त ३१ ऑक्टोबर रोजी “एकता दौड”चे (Run for Unity) आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा उद्देश भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकीकरणासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाला अभिवादन करणे तसेच राष्ट्रीय एकात्मता, ऐक्य व सामूहिक शक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा आहे.
ही “एकता दौड” (Run for Unity) ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता पोलीस परेड मैदान, रत्नागिरी येथून सुरू होईल. याचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते होणार असून यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या दौडीचा मार्ग पोलीस परेड मैदान (सुरुवात) जेल रोड चौक, जयस्तंभ, भाट्ये पूल, भाट्ये समुद्र किनारा व परत भाट्ये पूल, जयस्तंभ, जेल रोड चौक ते पोलीस परेड मैदान (समाप्ती) असा असेल. या कार्यक्रमात पोलीस कर्मचारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी, होमगार्ड्स, विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या दौड दरम्यान वैद्यकीय सहाय्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवून राष्ट्रीय ऐक्य, बंधुता आणि एकात्मतेचा संदेश दृढ करावा, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.




