
आंबिया बहार योजनेमध्ये सहभागी व्हा- जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले
रत्नागिरी, दि. 29 ):- सन २०२५-२६ मध्ये आंबिया बहार योजनेमध्ये सहभागाकरिता विमा पोर्टल सुरु झाले असून, अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट या हवामान धोक्यापासून फळबागांचे संरक्षण करण्यासाठी निर्धारित केलेल्या कालावधीत या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) असणे व ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॕप्लिकेशनमध्ये फळपिकाची नोंद करणे या बाबी बंधनकारक आहेत. विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी), बँक तसेच www.pmfby.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावा. विमा अर्जासोबत फळबागेचा जीओ टॅगिंग असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील.
अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा. विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी प्रतिकेश शिगवण (मो.क्र.९८८१९६७२३३) असा आहे. तरी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी लवकरात लवकर आपल्या फळपिकाचा विमा काढून घ्यावा.
जिल्ह्यामध्ये अधिसूचित केलेल्या ८३ महसूल मंडळात आंबा व काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येते. (आंबा, काजू फळपिक वय ५ वर्ष), कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही सदर योजना लागू राहील. मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसल्यास त्याबाबतचे घोषणापत्र सहभाग नोंदविण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर संबंधित बँकेत देणे आवश्यक आहे. संबंधित बँकेसोबत संपर्क साधावा. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकांसाठी ०.१० हे ते जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्रादर विमा नोंदणी करता येईल. या योजनेचा विमा संरक्षित कालावधी हा १ डिसेंबर २०२५ ते १५ मे २०२६ आहे.
आंबा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख ७० हजार रुपये व शेतकरी विमा हप्ता १३ हजार ६०० रुपये प्रती हेक्टर आणि काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख २० हजार रुपये व शेतकरी विमा हप्ता ६ हजार रुपये प्रती हेक्टर आहे. संभावित हवामान धोके महसूल मंडळनिहाय स्थापित केलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वारा वेग, आर्द्रता इत्यादी माहिती स्वयंचलितरित्या नोंदवली जाते. या माहितीच्या आधारे शासन निर्णयामध्ये निर्धारित केलेल्या कालावधीत हवामान धोके लागू झाल्यानंतर विमाधारक शेतकरी यांना नुकसान भरपाई लागू होते. जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लि. या कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत आहे. योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंवर २०२५ ही आहे.
विमा परतावा मिळण्यासाठी आवश्यक असणारी हवामान प्रमाणके- पीक- आंबा
अवेळी पाऊस – १ डिसेबर ते ३१ मार्च, एक दिवशी ०५ मि.मी. किवा त्यापेक्षा जास्त. कमी तापमान – १ एप्रिल ते १५ मे, एक दिवशी १० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त १ जानेवारी ते १ मार्च, सलग ३ दिवस १३ डिग्री से. किवा त्यापेक्षा कमी. जास्त तापमान – १ मार्च ते १५ मे – सलग ३ दिवस ३७ डिग्री से. किंवा त्यापेक्षा जास्त. वेगाचा वारा १६ एप्रिल ते १५ मे- २५ कि. मी प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त (नुकसान, झाल्यास ७२ तासात विमा कंपनीस/कृषि विभागास तक्रार करणे आवश्यक) गारपीट – १ फेबुवारी से ३१ मे- गारपीट होवू नुकसान झाल्यास ७२ तासान विमा कंपनीस/कृषि विभागास तक्रार करणे आवश्यक.
पीक – काजू-अवेळी पाऊस – १ डिसेंवर ते २८ फेब्रुवारी एक दिवशी ५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त. कमी तापमान – १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी सलग ३ दिवस १३ डिग्री से. किंवा त्यापेक्षा कमी. गारपीट – १ जानेवारी ते ३० एप्रिल गारपीट होऊन नुकसान झाल्यास ७२ तासात विमा कंपनीस/कृषी विभागास तक्रार करणे आवश्यक.
वरीलप्रमाणे हवामानाची नोंद महसूल मंडळामधील स्थापित असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रावर झाल्यानंतर विमाधारक शेतकऱ्यांना विमा परतावा लागू होतो.




