
हर्णै बंदरात दिवाळीत पर्यटकांची रेकॉर्डब्रेक गर्दी; मासळी खरेदीतून लाखोंची उलाढाल
दापोली : दिवाळी सुट्टी आणि पाडव्याच्या मुहूर्तावर दापोली तालुक्यातील किनारपट्टीवर पर्यटकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. विशेषतः हर्णै बंदरात गेल्या तीन दिवसांपासून सकाळी व संध्याकाळी पर्यटकांची रेकॉर्डब्रेक गर्दी पाहायला मिळत असून बंदर जत्रेसारखे गजबजून गेले होते. पर्यटकांच्या मासळी खरेदीतून दररोज लाखोंची उलाढाल होत असून मच्छीमार महिलांना चांगला फायदा मिळत आहे, असे येथील मच्छिमारांनी सांगितले.
हर्णै बंदर हे दापोली तालुक्यातील सर्वात मोठे मासळी केंद्र आहे. या परिसरातील चिमणी बाजार हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत असून ताज्या मासळीच्या लिलावात सहभागी होण्याचा वेगळाच अनुभव पर्यटक घेत आहेत. कोळंबी, सुरमई, पापलेट, बांगडा, म्हाकुळ, बेबी म्हाकुळ, बग्गा आदी जातींना मोठी मागणी आहे. लिलावातील बोली लावताना पर्यटकांना ‘सीफूड मार्केट’चा अनोखा अनुभव मिळत आहे.
सध्या बंदरामध्ये म्हाकूल ३५० रु. किलो, पापलेट ८०० रु. किलो, सुरमई ६०० रु. किलो, कोळंबी (जाडी) ३०० रु. किलो, बांगडा १०० रु. किलो, सारंगा ३५० रु. असे दर आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मासळीची आवकही मुबलक झाल्याने खवय्यांची चांगलीच चंगळ उडाली आहे.
दिवाळीच्या सलग सुट्टीत दाभोळ ते केळशी किनारपट्टीवरील हॉटेल्स व रिसॉर्ट्स फुल्ल झाले आहेत. ‘झिंगा फ्राय’, ‘पापलेट थाळी’, ‘सुरमई थाळी’, ‘कोळंबी बिर्याणी’ कोळंबीचा रस्सा, मच्छीफ्राय आणि ‘खेकड्याचा रस्सा’ यांसारख्या कोकणी मसालेदार डिशेसचा पर्यटकांना मोह आवरत नाही. अनेक पर्यटक बंदरातून मासळी खरेदी करून थेट रिसॉर्टमध्ये ती तयार करून खात आहेत. ‘दापोलीला आलो आणि हर्णै बंदरातली ताजी मासळी खाल्ली नाही, असं होत नाही,’ असे पर्यटक आवर्जून सांगतात.
पर्यटकांची गर्दी एवढी वाढली की, मुरुडपासून हर्णै बीचपर्यंत प्रचंड ट्रॅफिक जाम होत आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेला कुठे मोकळी जागा दिसेल तिथे पर्यटक आपली वाहने उभी करत होती. पोलीस प्रशासनाने १० ते १५ कर्मचारी तैनात केले असले, तरी ट्रॅफिक आटोक्यात आणणे अवघड होत आहे.
थंड वातावरण, स्वच्छ समुद्रकिनारे आणि ताजी मासळी यामुळे दापोलीचा किनारपट्टी परिसर पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. यंदाच्या दिवाळीत दापोली तालुका पर्यटकांनी अक्षरशः गजबजून गेला असून हर्णै बंदरातली ही गर्दी तालुक्याच्या पर्यटन विकासाची साक्ष देणारी ठरत आहे.
“हर्णै बंदर परिसर खूप छान आहे. गेले दोन ते तीन वर्ष आम्ही याठिकाणी येत आहोत. या अश्या निसर्गरम्य वातावरणात खूप छान वाटत. याठिकाणी मासळी देखील चांगली मिळाली थोडी महाग आहे; परंतु ताजी-ताजी मिळते. त्यामुळे ती खायला खूपच मज्जा येते”, असे पुणे येथील पर्यटक विश्वास खंडागळे यांनी सांगितले.
“यावर्षी पर्यटकांची खूपच गर्दी झाली आहे. व्यवस्था देखील कमी पडली एवढी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे,” असे हर्णै येथील आदर्श रेसिडन्सीचे मालक नितीन शिगवण यांनी सांगितले




