वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांचं निधन

मुंबई : मराठी रंगभूमीवरील एक तेजस्वी नाव, मालवणी नाटकांचा पाया रचणारे प्रतिभावान नाटककार गंगाराम गवाणकर (वय ८६) यांचे सोमवारी निधन झाले. दहिसर (पूर्व) येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. सोमवार रात्री प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने मराठी नाट्यविश्वाने एक सर्जनशील, लोकभाषेचा प्रामाणिक पुरस्कर्ता गमावला आहे. कोकणातील बोलीभाषेला कलात्मक रूप देऊन, तिला मुख्य प्रवाहात आणणारे गवाणकर हे नाव म्हणजे मराठी नाटकाच्या इतिहासातील एक अविभाज्य अध्याय आहे.

मराठी रंगभूमीवर मालवणी नाटकांची स्वतंत्र लाट निर्माण करण्याचे श्रेय गवाणकर यांना जाते. ‘वेडी माणसे’ हे त्यांचे पहिले नाटक असून, त्यानंतर ‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वरपरीक्षा’ यांसारखी अनेक नाटके त्यांनी लिहिली. त्यांच्या लेखनात विनोद, व्यंग आणि वास्तव यांचा सुंदर मिलाफ आढळतो. ‘वात्रट मेले’ या नाटकाचे तब्बल दोन हजारांहून अधिक प्रयोग झाले, तर ‘वन रूम किचन’ या नाटकाने हजारावर प्रयोगांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

त्यांचे सर्वांत गाजलेले नाटक म्हणजे ‘वस्त्रहरण’. या नाटकाने मराठी रंगभूमीवर मालवणी भाषेची प्रतिष्ठा वाढवली आणि मच्छिंद्र कांबळी यांच्यासारखा मालवणी नटसम्राट घडवला. वस्त्रहरणचे तब्बल पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले आणि या नाटकाचे प्रदर्शन दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या ‘भारत रंगमहोत्सव’मध्येही झाले. त्या काळातील अनेक गाजलेल्या किश्श्यांना साठवून ठेवणारे त्यांचे आत्मकथन ‘व्हाया वस्त्रहरण’ हे पुस्तक रसिकांच्या मनात आजही लोकप्रिय आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button