
मराठा आरमाराची शान! छत्रपती नगर येथे ३० फूट लांब ‘विजयदुर्ग’ साकारला
श्री शिवशंभू मित्र मंडळाच्या ३० हून अधिक सदस्यांची पंधरा दिवस अहोरात्र मेहनत; शिवप्रेमींची गर्दी
रत्नागिरी : श्री शिवशंभू मित्र मंडळाने यंदाच्या उत्सवानिमित्त छत्रपती नगर, साळवी स्टॉप येथे मराठा आरमाराचा आधारस्तंभ असलेल्या श्री विजयदुर्ग किल्ल्याची भव्य आणि हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. तब्बल १५ दिवस रात्रंदिवस मेहनत घेऊन साकारलेला हा ३० फूट लांब, १५ फूट रुंद आणि ४ फूट उंच जलदुर्ग सध्या परिसरातील चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरला आहे.
मंडळातील शौर्य मांजरेकर, अथर्व शिंदे, आर्यन चव्हाण, रुचिग मूडे, सुधीर मावडी, आदेश शेलार, तनिष रेडीज, अनिल बावडेकर, सिद्धू भोरे, श्रीयोग चव्हाण, अखिलेश बांबाडे, वैभव पांचाळ, अजय रेडीज, गौरव सावंत, निखिल सावंत, प्रसाद सावंत, अभिजीत गिरकर, अथर्व वरे, नेहा सावंत, ऋषी दुधाने, अंशिका शिंदे, शिवांगी चव्हाण, आकांक्षा चव्हाण, वेदिका चव्हाण, राजस वने, अद्वैत रासकर, यश सुर्वे, श्रेयस झगडे, शुभम मावडी, ऋत्विज पेडणेकर, वेदांत सावंत आणि इतर सदस्यांनी एकत्र येत हा ऐतिहासिक ठेवा उभा केला आहे.
या प्रतिकृतीत विजयदुर्ग किल्ल्याचे महत्त्वपूर्ण बांधकाम जसे की, जीवीचा दरवाजा, गोमुखी दरवाजा, सदर, दारू कोठार, हनुमान मंदिर, जखीणीची तोफ, जखिंण मंदिर, माडी, खलबतखाना आणि बारा तोफ यांसारखे बारकावे हुबेहूब साकारले आहेत. किल्ल्यावर सदाशिव, गोविंद, मनोरंजन, गगन, शिवाजी, व्यंकट, शहा, शिंदे सिकंवरा, तुटका, दर्या, सर्जा, राम, माडी आणि घनची असे महत्त्वाचे बुरुज दर्शवले आहेत. या जलदुर्गाच्या चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला देखावा तयार करण्यात आला आहे.
या भव्य किल्ल्याचा शुभारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर आणि ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्यासह पत्रकार राजेंद्र चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे, योगेश विरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
हा किल्ला त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत दररोज सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुला राहणार आहे. या ऐतिहासिक प्रतिकृतीला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.



