
पुन्हा एकदा राजापूर तालुक्याचे विभाजन होणार?
राज्यातील नवीन तालुके निर्मितीने राजापुरात एकच चर्चा
आमदार नीलेश राणे यांनी राजापूरलगत असलेल्या खारेपाटण येथील एका कार्यक्रमामध्ये खारेपाटण तालुका निर्मिती दृष्टीक्षेपात असल्याचे जाहीर करत शासन स्तरावर लागेल ती मदत करणार असल्याची ग्वाही दिली. यामुळे पुन्हा एकदा राजापूर तालुक्याचे विभाजन होणार हे पुढे आले असून शासन लवकरच तालुक्याची निर्मिती करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. नवीन तालुके झाल्यास राजापूर तीन तालुक्यामध्ये विभागला जाणार हे निश्चित. यामुळे तालुक्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्यात सध्या नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीची चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने नवीन २२ जिल्हे आणि ४९ तालुक्यांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव तयार केला आहे. राज्यातील विधिमंडळ अधिवेशनात अनेक आमदारांनी नवीन जिल्ह्यांची मागणी केली. राज्य सरकारने यासाठी मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. या समितीत वित्त, महसूल, नियोजन विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते सहभागी आहेत. प्रशासकीय, आणि स्थानिक विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी शासन हा निर्णय घेत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. सध्या अस्तित्वात असलेल्या ३६ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार होणार आहेत. यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या मागणीनुसार तालुक्याचीही निर्मिती होणार आहे. येत्या २६ जानेवारी २०२६ ला या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com




