
चिपळूण शहराचा पाणीप्रश्न आणखी गंभीर
गेल्या काही दिवसांपासून चिपळूण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तो पूर्वपदावर आणण्यासाठी नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत असतानाच आता कोळकेवाडी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आणखीनच कमी झाल्याने पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे प्रशासन पुन्हा जिल्हाधिकार्यांकडे पत्रव्यवहार करणार आहे.
नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदेने खेर्डी-माळेवाडी व गोवळकोट येथे जॅकवेल बांधल्या असून तेथे जलशुद्धीकरण केंद्रही साकारण्यात आली आहेत. मात्र या जॅकवेल वाशिष्ठी पाण्यावरच अवलंबून असल्याने सध्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहराला पाणी प्रश्नाबाबत काही दिवसांपूर्वी भाजपने शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेवर धडक दिली होती. यावेळी प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते. तसेच माजी नगरसेवक उमेश सकपाळ यांनी हा प्रश्न पालकमंत्री उदय सामंत यांच्या कानावर घातल्याने त्यांनी धरण व्यवस्थापनाला पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एक दिवस पुरेसे पाणी सोडण्यात आले होते. मात्र गेले २ दिवस पाणी कमी सोडले जात असल्याने नागरिकांचा पाणीप्रश्न आणखीनच गंभीर बनत चालला आहे.www.konkantoday.com



