स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचे सर्वच नियम सरकारने धाब्यावर बसवले…

पालपेणे येथे आमदार भास्कर जाधव यांची सरकारवर सडकून टीका

आबलोली ) : “७४ व्या घटना दुरुस्तीनंतर आज देशामध्ये जे सरकार आहे ते निवडणुकांबाबतचे सगळेच नियम, प्रथा, परंपरा धाब्यावर बसवत आहेत. ज्याला खऱ्या अर्थाने स्वास्थ्य संस्था म्हणतात त्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांची पूर्णपणे तोडमोड केलेली आहे. वाटोळे लावले आहे आणि आपल्याला वाटेल तशा पद्धतीने, कायदा न मानता मनमानी कारभार हाकत आहे. प्रत्येक देशाची एक घटना असते. त्या अनुरूप राज्य सरकार कारभार चालवते; परंतु विद्यमान सरकारने ती घटना पाळलीच नाही,” अशी सडकून टीका गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर केली आहे.
गुहागरचे ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी काल (२६ ऑक्टोबर) गुहागर तालुक्यातील पालपेणे येथे असगोली जि. प. ठाकरे शिवसेनेची बैठक घेतली होती. त्यावेळी राज्यांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांवरून राज्य सरकारवर टीका करताना ते बोलत होते.
ते म्हणाले, “देशामध्ये ७४ वी घटनादुरुस्ती झाली आणि त्या घटना दुरुस्तीमध्ये अशा प्रकारचा कायदा करण्यात आला की, कुठलीही निवडणूक पाच वर्षापेक्षा जास्त पुढे ढकलता येत नाही. फार तर विधानसभा किंवा लोकसभा यांची मुदत संपल्यानंतर पंधरा दिवसांपेक्षा जास्त ते सरकार अस्तित्वामध्ये ठेवता येत नाही. तशाच पद्धतीने ग्रामपंचायत असतील, सोसायटी असतील, पंचायत समित्या असतील किंवा जिल्हा परिषद असतील, नगरपंचायती असतील किंवा महानगरपालिका असतील यांचा पाच वर्षांचा कालावधी संपला. हा कालावधी संपण्यापूर्वीच निवडणुका घेतल्याच पाहिजेत, अशा प्रकारची ७४ व्या घटना दुरुस्तीत तरतूद करण्यात आली, कायदा करण्यात आला; मात्र निवडणुकांबाबतचे सगळेच नियम, प्रथा, परंपरा धाब्यावर बसवत आहेत.”
“हे सरकार निवडणुका घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. खालचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हातात जाऊच नये. तसेच सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्व कारभार मंत्र्यांनीच चालवायचा यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. त्यांच्या या प्रयत्नांना कोर्टाच्या निर्णयाने छेद दिला आहे. मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका येत्या ३१ जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत घ्यायच्याच आहेत, असे न्यायालयाने सांगितले आहे,” असे आमदार जाधव म्हणाले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ शिवसैनिक विनायक मुळे, जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख सचिन बाईत, सिद्धी सुर्वे, संजय पवार यांच्यासह असगोली जि. प. गटातील महिला, पुरुष, पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button