
वैभव खेडेकरांसोबत गेलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांची घर वापसी
खेड : रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गड पुन्हा मजबूत झाला आहे. वैभव खेडेकर यांच्यासोबत पक्षातून बाहेर गेलेले अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते झालेल्या गैरसमजांना मागे टाकत पुन्हा मनसेमध्ये परतले आहेत.
जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांची मुंबईत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात पुनर्प्रवेश करण्यात आला. सौंदळकर यांच्यासोबत उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, जुनेद बंदरकर, जिल्हा सचिव सुनील साळवी, तालुका अध्यक्ष सचिन शिंदे (रत्नागिरी), संदेश साळवी (चिपळूण), नीलेश भामणे (खेड), तसेच तालुका सचिव रूपेश चव्हाण यांच्यासह मोठा कार्यकर्ता गट पुन्हा सक्रिय झाला आहे. या घडामोडीमुळे नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेल्या वैभव खेडेकरांना मोठा धक्का बसल्याचे राजकीय निरीक्षकांकडून सांगितले जाते.
मनसेतून बाहेर पडल्यावर त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त तीनवेळा पुढे ढकलावा लागला होता. अखेर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला होता. त्या वेळी मनसेतील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली होती; मात्र आता तेच पदाधिकारी पुन्हा मनसेच्या झेंड्याखाली आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मनसेचे संघटन पुन्हा जोमाने उभे राहत असल्याचे चित्र दिसत आहे. “रत्नागिरीचा गड पुन्हा मनसेकडे आला आहे. आगामी काळात पक्ष संघटन अधिक बळकट करून राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मैदानात उतरणार,” अशी भावना नव्याने दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही पुनर्वापसी मनसेसाठी निर्णायक मानली जात असून पुढील राजकीय समीकरणांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




