राजापूर पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत बेपत्ता झालेल्या एका 28 वर्षीय युवतीचा शोध लावून तिला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले

राजापूर पोलिसांनी अत्यंत जलदगतीने आणि तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर करत अवघ्या 24 तासांच्या आत बेपत्ता झालेल्या एका 28 वर्षीय युवतीचा शोध लावून तिला सुखरूप तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे. राजापूर पोलिसांच्या या समन्वित मोहिमेमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

​राजापूर पोलीस स्टेशनच्या नापत्ता रजि. नं. 16/2025 नुसार, सौंदळ, मुसलमानवाडी येथील रहिवासी असलेली शबनम युसूफ पाटणकर (वय 28) ही दि. 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु ती न सापडल्याने वडील युसूफ पाटणकर यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शबनम काही काळापासून मानसिक उपचार घेत असल्याची माहिती मिळाली होती.

​दुसऱ्या दिवशी सकाळी शबनमने एका अनोळखी महिलेच्या मोबाईलवरून घरी फोन करून आपण गोवा येथे असल्याचे सांगितले. तसेच घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली. थोड्याच वेळात तिने पुन्हा दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधून आपण पनवेलला जात असल्याचे आणि रेल्वेत बसल्याचे सांगितले.

​या माहितीची गांभीर्याने दखल घेत राजापूर पोलिसांनी तत्काळ तांत्रिक विश्लेषणाचे चक्र फिरवले. कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशनच्या आधारावर रेल्वे प्रवासाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार राजापूर रोड रेल्वे स्टेशन येथे मांडवी एक्स्प्रेस येताच पोलीस पथक आणि मुलीचे नातेवाईक यांनी संयुक्तपणे सर्व डब्यांची कसून तपासणी केली. या तपासणीत बेपत्ता झालेली शबनम पाटणकर रेल्वेच्या एका बोगीत बसलेली आढळून आली.

​पोलिसांनी तिला तातडीने रेल्वेतून खाली उतरवले आणि आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून तिच्या वडिलांच्या ताब्यात दिले. अवघ्या 24 तासांत ही मोहीम यशस्वी झाली. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी कदम आणि राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button