
राजापूर राष्ट्रवादीत भूकंप नाही; निलेश भुवड यांचा खुलासा
राजापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये कोणताही भूकंप झालेला नसून, पक्षाला धक्का बसल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळ आहे, असा दावा पक्षाचे युवा नेते निलेश भुवड यांनी केला आहे.
भुवड म्हणाले की, पक्षाने गत महिन्यातच आबा आडीवरेकर यांना तालुकाध्यक्ष पदावरून पायउतार करत, राजापूर शहर अध्यक्ष संतोष सातोसे यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे सध्या राजापूर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष संतोष सातोसे आहेत.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने आणि वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पक्षाचे काम जोमाने सुरू असल्याचे सांगत, भुवड म्हणाले की काहीजण स्वार्थासाठी पक्षाचा व पदाचा गैरवापर करत होते. अशा व्यक्तींवर कारवाई करून पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
“अशा लोकांच्या पक्षांतरामुळे आमच्या पक्षाला धक्का बसतो, असा गैरसमज पसरवला जात आहे; परंतु हा संपूर्ण खोडसाळ प्रचार असून शरद पवार गट अधिक मजबूतपणे कार्यरत आहे,” असा दावा निलेश भुवड यांनी केला.




