
मुंबई-गोवा महामार्गावर ओंकार हत्तीचा दीड तास ठिय्या; वाहतूक ठप्प.!
मागील काही दिवसांपासून कास, मडुरा, रोणापाल आणि आसपासच्या गावांमध्ये धुमाकूळ घालणारा ‘ओंकार’ हत्ती आज (शनिवारी) पुन्हा एकदा अवतरला आणि थेट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उतरला. संध्याकाळच्या सुमारास इन्सुली डोबवाडी येथे या हत्तीने रस्त्यावरच ठिय्या मारल्याने महामार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली.
गोवा राज्यांतून सावंतवाडी तालुक्यातील कास,मडुरा येथे २७ सप्टेंबर रोजी ओंकार हत्ती दाखल झाला होता.मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार हत्तीने आज सीमा ओलांडून मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या इन्सुली येथे प्रवेश केला. सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास तो महामार्गावर आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
ऐटीत तो रोणापाल रस्त्यावरून येत असताना लोकांनी त्याला पाहिले. वाहनांच्या हॉर्नकडे पूर्ण दुर्लक्ष करत तो शांतपणे महामार्गावरील रस्त्याच्या मधोमध उभा राहिला. परिणामी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सध्या वन कर्मचारी आणि हाकारे देणारे वन मजूर हत्तीच्या पाठिमागे आहेत.
महामार्गावर ठिय्या मारल्यानंतर हत्तीने इन्सुलीतील भरवस्तीच्या कुडवटेंब व सावंतटेंब परिसरात प्रवेश केला. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रित केली. त्याचवेळी वनविभागाचे अधिकारी आणि जलद कृती पथक तातडीने पोहोचले. हत्तीला जंगलाकडे वळवण्यासाठी फटाके वाजविण्यात आले, मात्र त्याने महामार्ग ओलांडत पुन्हा इन्सुली गावात प्रवेश केला.
दरम्यान, मागील पंधरा दिवसांपासून ‘ओंकार’ हत्तीने मडुरा, कास परिसरात थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. नागरिकांमध्ये सतत भीतीचे सावट निर्माण झाले असून वनविभागाने हत्तीला पकडण्यासाठी राबवलेली मोहीम अद्याप निष्फळ ठरली आहे.




