
मिऱ्या-कोल्हापूर महामार्गावर धुळीचे साम्राज्य
ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी : मिऱ्या- कोल्हापूर महामार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असले तरी त्यामध्ये कोणतीही गती दिसून येत नाही. या रस्त्यावरील कामाच्या संथ गतीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः धूळ, खड्डे आणि वाहतुकीतील अडथळे यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. वाऱ्यामुळे रस्त्यावरील धूळ सर्वत्र पसरत असून, वाहनचालकांना पुढचा रस्ता दिसणेही कठीण झाले आहे. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून, ही परिस्थिती जनतेच्या जीवाशी खेळ केल्यासारखी असल्याची टीका युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद सावंत यांनी केली आहे.
यावर तीव्र नाराजी व्यक्त करत युवासेना दक्षिण जिल्हाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रसाद सावंत यांनी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, “महामार्गाच्या कामात झालेला विलंब असह्य झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेकडे आणि आरोग्याकडे शासन व कंत्राटदार दोघांचेही दुर्लक्ष झाले आहे. जर त्वरीत उपाययोजना करून कामाची गती वाढवली नाही आणि धुळीपासून बचावासाठी योग्य उपाय केले नाहीत, तर युवासेना आपल्या शैलीत रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.”
सावंत यांनी पुढे सांगितले की, रस्त्याचे काम करताना नागरिकांच्या सोयी-सुविधांचा विचार करणे ही शासनाची जबाबदारी आहे. मात्र सध्या स्थिती अशी आहे की, कामाच्या नावाखाली जनतेला त्रास दिला जात आहे. या निष्काळजीपणाबद्दल प्रशासनाला जाब विचारला जाईल आणि गरज पडल्यास ठिकठिकाणी आंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
स्थानिक नागरिकांनीही युवासेनाच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवला असून, प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे आणि महामार्गाचे काम नियोजित मुदतीत पूर्ण करावे, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.




