ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाच्या सरी कोसळणारच ;यंदा पावसाचे सहाव्या महिन्यात आगमन, पूर्वमोसमी, मोसमी आणि उत्तर मोसमी पावसाचा फटका!

मे महिन्यात सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर संपत आला तरी थांबताना दिसत नाही. ऐन दिवाळतही पाऊस कोसळला. मात्र हा पाऊस ऑक्टोबर अखेरपर्यंत कोसळण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. यंदाच्या वर्षात पूर्वमोसमी पाऊस कोसळला, नंतर मोसमी पाऊस आणि त्यानंतर उत्तर मोसमी पाऊसही सुरूच आहे. त्यामुळे पावसाचा काळ जवळपास सहा महिने झाला आहे. यंदाचे निम्मे वर्ष पावसात गेले आहे. आणखी काही काळ याच पावसाचा सामना करावा लागणार आहे.

दिवाळीनंतरही महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित झाला आहे. मान्सून अजून गेला नाही का, पण हवामान तज्ज्ञांच्या मते, पाऊस फक्त दक्षिण-पश्चिम मान्सूनपुरता मर्यादित नसतो. दरवर्षी जून ते सप्टेंबर हा महाराष्ट्रासाठी मुख्य मान्सूनचा काळ असतो. मात्र, या काळाच्या बाहेरही विविध हवामान प्रणाल्यांमुळे अधूनमधून पाऊस होऊ शकतो, अशी माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.

ईशान्य मान्सून (Northeast Monsoon) ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत उत्तर मोसमी पाऊस आणतो, तर पश्चिम विक्षोभ (Western Disturbance) जानेवारी ते मार्च या कालावधीत उत्तर भारतासह महाराष्ट्रातही कधीकधी हलका पाऊस देतो. त्याचप्रमाणे, एप्रिल-मे महिन्यांत पूर्व-मान्सून काळातील लहान मोठी वादळे (Thunderstorms) आणि लाइन विंड डिस्कॉन्टिन्युइटी (Line Wind Discontinuity) या प्रणालींमुळे देखील काही भागांत पाऊस पडतो. मात्र या कालखंडांतील पाऊस नियमित नसतो, तर हवामानातील विशिष्ट परिस्थितीनुसारच तो घडतो. असेही मोडक यांनी सांगितले आहे.

यंदा सर्वच स्थितीत पाऊस

या वर्षी मात्र परिस्थिती वेगळी राहिली आहे. मे महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत सलग विविध हवामान प्रणाली सक्रीय राहिल्याने सतत पावसाचा अनुभव आला आणि त्यामुळे मान्सून जणू सहा महिने चालल्याची भावना निर्माण झाली आहे.

या वर्षीचा दक्षिण-पश्चिम मान्सून नेहमीपेक्षा थोडा लवकर म्हणजे २६ मे रोजी सुरु झाला आणि नियोजित वेळेत म्हणजे १० ऑक्टोबर रोजी परत गेला.

पण त्याआधी मेच्या सुरुवातीला पश्चिम विक्षोभामुळे पाऊस झाला, त्यानंतर लाइन विंड डिस्कॉन्टिन्युइटीमुळे काही ठिकाणी पूर्व मोसमी सरी आल्या. आता मान्सून माघारी गेल्यानंतर पुन्हा एकदा ईशान्य मान्सून सक्रिय झाला असून, १५ ऑक्टोबरपासून तयार झालेल्या अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणासह महाराष्ट्राच्या काही भागांत पुन्हा पाऊस सुरू आहे. अरबी समुद्रातील हा पट्टा कोकण किनाऱ्याच्या समांतर उत्तर दिशेने सरकत असल्याने हा पावसाचा टप्पा ऑक्टोबर अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे यंदा मान्सून सहा महिने चाललेला नाही.

मात्र पूर्व मोसमी, मोसमी आणि उत्तर मोसमी या तिन्ही टप्प्यांतील सलग हवामान प्रणालींमुळे पावसाचा खंड न पडल्याने तो सहा महिन्यांचा मान्सून असल्याचा भास होतो आहे, अशी माहिती अभिजित मोडक यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button