
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ,
दिवाळीच्या सणानिमित्त देशभरात विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. कुणी सोनंनाणं, कुणी घरगुती वस्तू, तर कुणी दुचाकी चारचाकी वाहनं अशी काही ना काही खरेदी करत आहेत. यातील कुणी रोखीने, तर कुणी कर्ज काडून खरेदी करत आहेत.दरम्यान, छत्तीसगडमधील एक शेतकरी चक्क ४० हजार रुपयांची नाणी घेऊन दुचाकी खरेदी करण्यासाठी आला. त्याने दुचाकी खरेदी करण्यासाठी आणलेल्या नाण्यांचा ढीग पाहून शोरूममधील कर्मचारी अवाक् झाले.
दुचाकी खरेदी करण्यासाठी या शेतकऱ्याने १० आणि २० रुपयांची नाणी आणली होती. त्यांचं मूल्य सुमारे ४० हजार एवढं होतं. गेल्या सहा महिन्यांपासून खूप परिश्रम आणि बचत करून ही रक्कम जमवल्याचे या शेतकऱ्याने सांगितले. मात्र शेतकऱ्याने आणलेली नाणी मोजताना शोरूममधील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. या शेतकऱ्याने दुचाकीची उर्वरित रक्कम मात्र रोख नोटा देऊन भरली.




