
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढवणार
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहे, असा ठाम निर्धार पक्षाचे कोकण संपर्क प्रमुख सुशांत सकपाळ यांनी व्यक्त केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रीतम रूके,
कोकण विभागीय अध्यक्ष प्रकाश मोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य दादा मर्चंडे उपस्थित होते. बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची पूर्वतयारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आला. बैठकी दरम्यान खेड तालुकाध्यक्ष म्हणून गौतम तांबे आणि सरचिटणीस म्हणून जितेंद्र तांबे यांची नियुक्ती करण्यात आली.
सुशांत सकपाळ म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची चळवळ आहे. आगामी निवडणुका म्हणजे समाजातील वंचित, शोषित घटकांना प्रतिनिधित्व देण्याची संधी आहे. त्यामुळे प्रत्येक गावात शाखा उभारून पक्षाला बळकट करू. बैठकीत ‘गाव तिथे शाखा’ अभियान जिल्हाभर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच तरुण आणि ऊर्जावान कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देण्याचेही जाहीर करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाने महायुतीसोबत मिळून निवडणुका लढवाव्यात तसेच लोटे पंचायत समिती व बहिरवली गण रिपब्लिकन पक्षाला सोडावेत, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.



