
राजस्थानहून सांगलीत फुगे विकण्यासाठी आलेल्या गरीब दांपत्याच्या वर्षभराच्या तान्हुल्याचे अपहरण करून चिपळूण सावर्डेमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास विकण्याचा अमानुष डाव सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने (एलसीबी) उधळून लावला
राजस्थानहून सांगलीत फुगे विकण्यासाठी आलेल्या गरीब दांपत्याच्या वर्षभराच्या तान्हुल्याचे अपहरण करून चिपळूण सावर्डेमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास विकण्याचा अमानुष डाव सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने (एलसीबी) उधळून लावला. या प्रकरणात तिघांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून, इनायत अब्दुलसत्तार गोलंदाज (वय ४३, रा. किल्ला भाग, मिरज) यास अटक करण्यात आली आहे. त्याचे साथीदार इम्तीयाज पठाण व त्याची पत्नी वसीमा इम्तीयाज पठाण हे दोघे फरार असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
३ दिवसांच्या झुंजीनंतर तान्हुलं आईच्या कुशीत
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या अपहरणाने सांगलीत खळबळ उडाली होती. फुगे विक्रेते विक्रम पशपचंद बागरी (रा. विश्रामबाग, सांगली) हे रस्त्याच्या कडेला पत्नी व मुलासह झोपलेले असताना अज्ञातांनी त्यांच्या वर्षभराच्या बाळाचे अपहरण केले.
या घटनेनंतर सांगली पोलिसांनी तब्बल ५ हून अधिक अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कामाला लावले. तीन दिवस चाललेल्या तपास, चौकशी आणि छापेमारीनंतर अखेर पोलिसांनी लेकरू शोधून काढले आणि ते आईच्या कुशीत सुखरूप परत दिले.
बाळ परत मिळताच गरीब दांपत्याच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू ओघळले, तर पोलिसांनीही खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली.
अडीच लाखांचा “बाळ व्यवहार” उघड
तपासादरम्यान उघडकीस आले की, वसीमा पठाणची बहीण वहीदा ही सावर्डे (चिपळूण) येथे राहते. वहीदाची ओळख स्थानिक ट्रान्सपोर्ट व्यवसायिक सचिन राजेशिर्के आणि त्यांच्या पत्नीशी होती. वहीदाने वसीमा आणि इम्तीयाज यांची ओळख राजेशिर्के यांच्याशी करून दिली होती.
तिघांनी मिळून “बाळ देतो” म्हणून अडीच लाख रुपयांचा व्यवहार ठरवला, ज्यापैकी दीड लाख रुपये वर्षभरापूर्वी दिले गेले होते. यानुसारच तिघांनी सांगलीतून गरीब दांपत्याचे बाळ पळवले होते.
एलसीबीचा शौर्यपूर्ण तपास
या कारवाईत पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक बारवकर, पोलिस उपअधीक्षक प्रवीण गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या टीमने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावली.
या मोहिमेत सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार, चेतन माने, तसेच पोलिस कर्मचारी संदीप नलावडे, अमीरशा, सपना गराडे, अमर नरळे, सागर लवटे, नागेश खरात, दरिबा बंडगर, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, सतिश माने, अनिल कोळेकर, उदयसिंह माळी, महादेव नागणे, सुनिता शेजाळे, विक्रम खोत, केरूबा चव्हाण, विनायक सुतार, सुरज थोरात, सुशिल म्हस्के, श्रीधर बागडी, ऋतुराज होळकर, सुमित सुर्यवंशी, सोमनाथ पंतगे, सत्या पाटील, तसेच सावर्डे पोलिस ठाण्याचे अधिकारी गंगनेश पट्टेकर, उमेश कांबळे, साधना ओमासे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या शौर्यपूर्ण आणि संवेदनशील कामगिरीबद्दल सांगली एलसीबीच्या पथकाचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
७२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर लेकरू परत आईच्या कुशीत



