
पोलिसांनी बंदी घातली तरी देखील हर्णे किनाऱ्यावर वाळूत गाड्या चालवून पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक समुद्राच्या किनाऱ्यावर फिरायला आलेले पर्यटक अति उत्साहाच्या भरात भरात समुद्रकिनाऱ्यावर फोर व्हीलर गाड्या घालतात आणि अनेक वेळा भरतीमुळे या गाड्या वाळूत व पाण्यात रुतल्या जातात त्यामुळे अनेक वेळेला क्रेन मागवून गाड्या बाहेर काढाव्या लागतात यात गाड्यांचे नुकसान होते पर्यटकांना समुद्राचा अंदाज नसल्याने हे प्रकार घडत होते त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकानी याबाबत लक्ष घालून पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर आत मध्ये वाहने नेऊ नयेत यासाठी अनेक समुद्रकिनाऱ्यावर बांबूचे कंपाउंड घातले होते
मात्र असे असतानाही दापोली तालुक्यातील हर्णे येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांकडून हुल्लडबाजी करण्याचा प्रकार पुन्हा उघड झाला आहे.
दिवाळीच्या सुट्टीमुळे दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक आले आहेत . मात्र त्यातील काही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.
हर्णै येथील समुद्रकिनाऱ्यावरआपली वाहने नेवून हुल्लडबाजी करण्याचा प्रकार आज उघड झाला आहे. पर्यटनासाठी आलेल्या अनेक पर्यटकांना समुद्राच्या भरती ओहोटीचे वेळापत्रक माहित नसल्याने समुद्रकिनारी नेलेली वाहने भरतीच्या पाण्याने किनारीच रुतून बसल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. अनेक पर्यटक समुद्रकिनारी वेगाने वाहने चालवून स्टंट करत असल्याने किनाऱ्यावरील इतर पर्यटकांना त्याचा त्रास होतो व अपघाताचा धोकाही संभवतो यामुळे अशा अति उत्साही पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे



