
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून राज्यात तब्बल ६० खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून राज्यात तब्बल ६० खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी अतिरिक्त ६ हजारांमध्ये शुल्क ग्राहकांना आकारले जाणार आहे.मात्र, त्यामुळे ग्राहकांना दस्त नोंदणीसाठी रांगेत उभा राहण्याची आवश्यकता नाही. या निर्णयामुळे दस्त नोंदणी प्रक्रियेतील वेग, पारदर्शकता आणि सेवा गुणवत्तापूर्ण होणार असल्याचे मुद्रांक शुल्क विभागाने काढलेल्या निविदामध्ये म्हटले आहे.
आता खासगी दस्त नोंदणी कार्यालयांमधून पासपोर्ट कार्यालयांप्रमाणे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. संगणकीकृत सेवा, मार्गदर्शन, प्रतीक्षागृह, स्वच्छता, पिण्याचे पाणी, चहा-कॉफी तसेच अन्य सुविधा नागरिकांसाठी पुरविल्या जाणार आहेत. या अतिरिक्त सुविधांसाठी नागरिकांकडून सेवा शुल्क म्हणून जादा ६ हजार रुपयांची आकारणी होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्प्यात पुढील सहा महिन्यांत पुणे, साताऱ्यासह मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये ३० कार्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.
दुसऱ्या टप्प्यात पुढील दीड वर्षात प्रत्येक जिल्हा मुख्यालयात उर्वरित ३० कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. कमीत कमी दर आकारणाऱ्या संस्थेला हे काम देण्यात येणार आहे. निविदा भरण्याची अंतिम मुदत २५ ऑक्टोबर आहे. नोव्हेंबरमध्ये निविदा उघडून पुढील कार्यवाही होणार आहे,खासगी दस्त नोंदणी कार्यालयांमध्ये सहदुय्यम निबंधक आणि लिपिक हे शासकीय कर्मचारी असणार आहेत. शासकीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली खासगी संस्था इमारत, संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, स्वच्छता, चहा-कॉफी व इतर आवश्यक सोयी पुरविणार आहेत. या सेवांसाठीच खासगी संस्थेकडून ठरावीक शुल्क आकारले जाईल. तथापि, याच कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी करणे अनिवार्य नाही. ज्यांना अतिरिक्त सेवा शुल्क भरणे शक्य आहे, तेच खासगी कार्यालयांमधून दस्त नोंदणीची सुविधा घेण्याचा पर्याय निवडू शकतात



