
दिवाळी पाडव्याचा स्नेहबंध; रमेश कदम आणि भास्कर जाधव यांची ‘गोड’ भेट
चिपळूण : दिवाळीच्या आनंदमय वातावरणात चिपळूण शहरात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फराळ स्नेहबंधाचा कार्यक्रम भरविण्यात आला. यंदाही दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम उबाठा शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी पार पडला.
कार्यक्रमाला भास्कर जाधव यांचे सहकारी, हितचिंतक, कार्यकर्ते, मित्रमंडळी तसेच सर्वपक्षीय आणि सर्व धर्मीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वर्षीही कार्यक्रमात आकर्षक विद्युत रोषणाई, मराठी आणि हिंदी गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम, तसेच फराळाचे विविध पदार्थ आणि गरम कॉफीचा आस्वाद घेता आला. यामुळे दिवाळीचा आनंद अधिकच आल्हाददायक वातावरणात अनुभवता आला.
या पार्श्वभूमीवर शहरात चर्चेचा विषय ठरलेली घटना म्हणजे माजी आमदार रमेश कदम यांची आमदार भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी भेट. महाराष्ट्रात त्यांच्या राजकीय वैराची माहिती असून, या पार्श्वभूमीवर रमेश कदम यांनी फराळाचा आस्वाद घेतला, हा प्रसंग निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाचा ठरला.
आमदार भास्कर जाधव यांनी या स्नेहबंधाच्या कार्यक्रमाद्वारे सर्वधर्मीयांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. तसेच, समाजातील एकता, प्रेम, बंधुभाव आणि विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे फार महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी देखील या ऐतिहासिक भेटीला कौतुक व्यक्त केले आणि एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.




