
राज्यातील विरोधक 1 नोव्हेंबरला निवडणूक आय़ोगाच्या विरोधात मुंबईत विराट मोर्चा काढणार
राज्यातील विरोधक 1 नोव्हेंबरला निवडणूक आय़ोगाच्या विरोधात मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत.या मोर्चात मविआसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही सहभागी होणार आहे. त्यामुळे मतदार यांद्यांमधील घोळासंदर्भात विरोधकांनी आता रस्तावरच्या लढाईला सुरूवात केली आहे. तर विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने रडीचा डाव सुरू केल्याची टीका महायुतीच्या नेत्यांनी केली आहे.
मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत विरोधकांनी रान उठवलं आहे .निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर आता सर्वपक्षीय विरोधकांनी आयोगाविरोधातील मोर्चाची हाक दिली आहे. मविआसह मनसेनं निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला आहे. निवडणूक आयोगानं मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त कराव्यात असं आवाहन पुन्हा एकदा मविआसह मनसेनं केलं आहे. निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. तसंच निवडणूक आयोगाला दणका देणारचं असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या मोर्चात सहभागी होणार आहे. चोरीच्या वाटेनं मतदार घुसवल्याचा ज्यांना फायदा झाला ते कदाचित आमच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत, असा टोला जयंत पाटलांनी लगावला. सर्वपक्षीय विरोधकांच्या मोर्चाला मनसेनं पाठिंबा दिलाय. तर लोकशाही वाचवण्यासाठी हा मोर्चा असल्याचं काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. तर बाळा नांदगावकर यांनी निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा असल्याचं सांगितलं आहे.
तर विरोधकांचा हा मोर्चा म्हणजे रडीचा डाव असल्याची टीका भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. तर विरोधकांना पराभव आतापासूनच दिसत असल्याने विरोधकांनी असे आरोप करायला सुरूवात केल्याची टीका शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.




