
“महायुतीविरोधात पिल्लावळ प्रयत्नशील”, उदय सामंतांची राष्ट्रवादीवर टीका
कोकणात महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत सातत्याने महायुतीतील मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करत आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीला जर शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम केले नसते तर काय परिस्थिती झाली असती हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाही माहिती आहे. निवडून आलेल्या उमेदवारांना ही माहिती आहे, आणि आपल्या सगळ्यांना देखील माहिती आहे, असा टोला अप्रत्यक्षरीत्या त्यांनी चिपळूण येथील आमदार शेखर निकम यांना लगावला. याच पार्श्वभूमीवर चिपळूण येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत शिवसेनेचे नेते व पालकमंत्री उदय सामंत महायुतीमधील रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा व राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडे बोल सुनावले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार हे महायुती म्हणून निवडणुका लढवायच्या आहेत असं सांगत असतानाच महायुतीमधीलच काही पिल्लावळ महायुती होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतील तर माझी शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की, शिवसेना काय आहे हे तितक्याच आक्रमकपणे दाखवून देण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे. अशा शब्दात उदय सामंत यांनी जिल्ह्यातील महायुतीमधील काही पदाधिकाऱ्यांच्या समाचार घेतला आहे.




