
दापोली तालुक्यात तब्बल ७० ठिकाणी बेकायदेशीररीत्या जांभा चिरा खाणी सुरू -शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मुबीन शौकत मुल्ला
दापोली तालुक्यात तब्बल ७० ठिकाणी बेकायदेशीररीत्या जांभा चिरा खाणी सुरू आहेत. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसुली तोटा होत असल्याचा गंभीर आरोप शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मुबीन शौकत मुल्ला यांनी केला आहे.या संदर्भात त्यांनी तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
मुल्ला यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या परवानगीशिवाय अनेक खाणींमधून जांभा चिरा उत्खनन सुरू आहे. या बेकायदेशीर उत्खननामुळे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आणि काही अधिकाऱ्यांचे संगनमत स्पष्ट दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या खाणींमुळे परिसरातील पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून, डोंगर आणि टेकड्यांचे नैसर्गिक संतुलन बिघडत आहे. जड वाहनांमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.




