
दापोली आगारातील ईव्ही बस व चार्जिंग स्टेशनची विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई यांच्याकडून पाहणी
गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या पुढाकाराने दापोली आगाराला 35 ईव्ही बसेस प्राप्त होणार असून यातील 10 बसेस पहिल्या टप्प्यात आल्या आहेत. लवकरच याचे औपचारिक उद्घाटन गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या उपस्थितीत होईल असे आश्वासन शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई यांनी दिले.
दापोली आगाराला 10 ईव्ही बसेस प्राप्त झाल्यानंतर दि. 21 ऑक्टोबर रोजी या बसेसची पाहणी दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई यांनी केली. यावेळी उपस्थित कंपनीच्या चालक व व्यवस्थापकांनी बसची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर श्री. देसाई यांनी चार्जिंग स्टेशनची पाहणी करून यामध्ये कोणत्या त्रुटी आहेत. याची सविस्तर माहिती घेतली व या त्रुटी लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे आगारप्रमुख श्री. राजेंद्र उबाळे यांच्याकडून महामंडळाकडून या बसेस सुरू करण्यासाठी कोणते नियोजन करण्यात आले आहे याबाबत माहिती घेतली. , एसटीचा तोटा कमी होण्यासाठी व पर्यावरण रक्षणासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या ताफ्यामध्ये 5 हजार ईव्ही बसेस आणण्याचे निश्चित केले आहे. राज्याच्या विविध भागात हा उपक्रम सुरू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल 150 ईव्ही बसेस येणार असून राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या पुढाकाराने दापोलीत सर्वप्रथम 10 बसेस आणण्यात आल्या आहेत. एका शानदार कार्यक्रमाव्दारे या बसेस लोकार्पण करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 




