
थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव आंदोलन: बौद्ध समाजाच्या विराट मोर्चासाठी गावागावात प्रचारमोहीम

रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील थिबा राजा कालीन बुध्दविहार ठिकाणी होत असलेले कम्युनिटी सेंटर रद्द करण्यात यावे, थिबा राजा कालीन बुध्दविहाराचे उठवलेले आरक्षणाची नोंद पुर्ववत करावी, थिवा राजा कालीन बुध्दविहारासाठी राखीव ठेवलेली जागा बौध्द समाजाच्या ताब्यात द्यावी अशा महत्वाच्या मागण्यासाठी बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन इतिहासात पहिल्यांदाच विराट आंदोलन उभारले आहे. हा संघर्ष एका जागेचा असला तरी तो न्याय, समानता आणि स्वाभिमानाच्या लढ्याचे प्रतीक ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव आंदोलनांतर्गत येत्या २७ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या बौद्ध समाजाच्या विराट मोर्चाच्या तयारीसाठी 21 ऑक्टोबर पासून स्वतंत्र टीमद्वारे गावागावांत पत्रक वितरण आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या जनजागृती मोहिमेला बौद्ध बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक विभागानुसार प्रचार-प्रसार सुरू आहे. टीममध्ये आयु. सुनिल आंबूलकर, आयु. किशोर पवार, आयु. दिवेन कांबळे, आयु. रुपेश कांबळे व आयु. राजेंद्र कांबळे या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या टीमने बावीसहून अधिक खेड्यांमध्ये प्रभावी प्रचार करत कळझोंडी, खरवते, कोतवडे, पिरदवणे, बसणी, नेवरे, मालगुंड, वेतोशी, जांभरुण आदी गावांत घराघरांत भेट देऊन जनसंपर्क साधून आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे.
दुसरी टीम प्रकाश पवार व रणजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली पावस विभागात कार्यरत होती. या टीमने पूर्णगड, पावस, मावळंगे, गावडे आंबेरे, शिवार आंबेरे, दाभीळ आंबेरे, डोर्ले तसेच परिसरातील इतर गावांमध्ये फिरून नागरिकांपर्यंत पत्रके पोहोचवली आणि मोर्चाचे महत्त्व पटवून दिले. तर तिसऱ्या टीमने पाली विभागातील वेळवंड, चरवेली, पाली, खानू, निवसर आदी गावांचा दौरा केला आहे. शिवराम कदम, मुकुंद कांबळे, भरत कांबळे व भय्या पवार आदी कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन पत्रके वितरण करून आंदोलनाचा उद्देश जनतेसमोर मांडला आहे. या सर्व टीमच्या उत्साही सहभागामुळे आणि प्रभावी जनसंपर्क मोहिमेमुळे ‘थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव आंदोलनांतर्गत होणारा मोर्चा कोणत्याही परिस्थितीत यशस्वी ठरणार आहे’ अशी भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.




