कर्तव्य पार पाडताना मानवी संवेदनशीलतेचा उत्तम नमुना चिपळूण पोलिसांनी दाखवून दिला


कर्तव्य पार पाडताना मानवी संवेदनशीलतेचा उत्तम नमुना चिपळूण पोलिसांनी दाखवून दिला आहे. मंगळवार दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी शहरात पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांनी एका हताश वृद्ध नागरिकास मदतीचा हात देत माणुसकीचा खरा अर्थ उजळवला.
त्या दिवशी पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष शिंदे, हेडकॉन्स्टेबल प्रितेश शिंदे, डेडकॉन्स्टेबल अभी सकपाळ, पोलीस कॉन्स्टेबल केदार आणि किरण केदार हे चिंचनाका परिसरात पायी पेट्रोलिंग करत असताना त्यांना रस्त्याकडेला बसलेला एक वयोवृद्ध इसम दिसला. जवळ जाऊन विचारपूस केली असता, त्या इसमाने दोन रुपयांची मदत मागितली. परंतु पैशांपेक्षा माणुसकी मोठी हे दाखवत संतोष शिंदे यांनी त्याला दोन बिस्किटाचे पुडे आणि पाण्याची बाटली आणून दिली. त्यानंतर कॉन्स्टेबल प्रितेश शिंदे यांनी त्याला भाजी-चपाती देऊन जेवू घातले. पुढील चौकशीत त्या वृद्धाचे नाव अशोक सुबराव दायिंगडे (वय ७०, रा. कोळेगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे समोर आले. त्यांनी घरातून रागाने बाहेर पडून सुमारे वर्षभर भटकंती केल्याचे सांगितले. संतोष शिंदे यांनी त्वरित वरिष्ठांना माहिती दिली आणि त्या इसमास पोलीस स्टेशनमध्ये आणले.
डीवायएसपी. प्रकाश बेले व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळेगाव येथील पोलीस पाटील आणि त्या इसमाच्या मुलाशी संपर्क साधण्यात आन्म, नाईट ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस हवालदार प्रणाली शिंदे आणि कॉन्स्टेबल माने यांनी त्या वृद्धाची काळजीपूर्वक देखभाल केली. दुसर्‍या दिवशी मुलगा उमेश अशोक दायिंगडे पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून त्याच्या वडिलांना सुरक्षितपण त्याच्याकडे सोपवण्यात आले. या संपूर्ण घटनेतून पोलिसांचा कर्तव्यभाव आणि माणुसकीचा संगम दिसून आला. विशेषतः हेडकॉन्स्टेबल संतोष शिंदे यांनी दाखवलेली तत्परता, जिज्ञासू वृत्ती आणि संवेदनशीलता ही संपूर्ण पोलीस दलासाठी प्रेरणादायी आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button