‘आम्ही साहित्यप्रेमी’तर्फे ओरोसला ३१ रोजी ’बालकवी : एक शापित गंधर्व’ कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या ऑक्टोबरच्या मासिक कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) सायंकाळी ५ वाजता ‘बालकवी : एक शापित गंधर्व’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल.

‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या साहित्यिक व्यासपीठाचा हा आठवा मासिक कार्यक्रम आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ बालकवी (१३ ऑगस्ट १८९० – ५ मे १९१८) हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते.
आनंदी आनंद गडे, औदुंबर, फुलराणी, श्रावणमास या बालकवींच्या प्रसिद्ध कवितांपैकी काही होत. त्यांनी ७५ हून अधिक बालकविता लिहिल्या, त्याचबरोबर ‘औदुंबर’सारखी गूढगहन कविताही लिहिली. बालकवींची काव्यकारकिर्द उणीपुरी दहा वर्षांची होती. मात्र त्यांचे मराठी साहित्यातील स्थान अढळ आहे. यावेळचा कार्यक्रम बालकवी यांच्या काव्यसंपदेविषयी आहे.

या कार्यक्रमात खालील वक्ते बोलतील. ‘बालकवी : एक शापित गंधर्व’ (कार्यक्रमाचे बीजभाषण, सतीश लळीत), ‘बालकवी आणि लक्ष्मीबाई टिळक’ (डॉ. सई लळीत), कविता ‘उदासीनता’ (प्रगती पाताडे), कविता ‘फुलराणी’ (सुस्मिता राणे), कविता ‘औदुंबर’ (ॲड. सुधीर गोठणकर) असे कार्यक्रम सादर होतील.

ओरोस येथे मार्च महिन्यात स्थापन झालेल्या ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या व्यासपीठाने आतापर्यंत सात मासिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. लेखक प्रवीण बांदेकर यांचे व्याख्यान व कवी दादा मडकईकर यांच्या कविता, ‘मला आवडलेले पुस्तक’, कथाकथन, मानसोपचारतज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांची प्रकट मुलाखत, ‘आषाढसरी’ कविसंमेलन, युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याची मुलाखत, ‘वंदन आचार्य अत्रे यांना’ अशा या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांना ओरोस परिसरातील रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व कार्यक्रम वेळेवर सुरु व्हावा, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button